Nashik Crime: धक्कादायक! GST च्या कर्मचाऱ्याकडून कोट्यवधीची फसवणूक, नाशिकमधील एकाने चिठ्ठी लिहून जीवन संपवलं
Nashik Crime : जीएसटी विभागातील कर्मचाऱ्याने कोट्यवधींची फसवणूक केल्याने एकाने टोकाचे पाऊल उचलल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे,

Nashik Crime : नोकरीच्या आमिषांना बळी पाडून अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातला जातो. मात्र, जीएसटी (GST) विभागातील कर्मचाऱ्याने एकाची तब्बल सव्वा कोटींची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. यामुळे मानसिक तणावातून नाशिकच्या अंबड (Ambad) येथील प्रवीण सोनवणे (Praveen Sonawane) यांनी मामेभावाच्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. (Nashik Crime News)
याबाबत अधिक माहिती अशी की, स्वतःच्या मुलांसह नातेवाईकांच्या मुलांना नोकरी लावून देण्यासाठी संशयित सचिन चिखले याला प्रवीण सोनवणे यांनी तब्बल सव्वा कोटी रुपये दिले. मात्र, दोन वर्ष उलटून नोकरी नाही आणि पैसेही परत मिळाले नसल्याने प्रवीण सोनवणे यांनी मानसिक तणावातून मामेभावाच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या पूर्वी प्रवीण सोनवणे यांनी एक चिठ्ठी लिहून संशयिताचा त्यात उल्लेख देखील केला आहे. सचिन चिखले याच्याविरोधात नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माझ्या आत्महत्येस सचिन चिखले जबाबदार
प्रवीण सोनवणे यांनी दोन वर्षांपूर्वी स्वतःच्या ओळखीच्या लोकांकडून पैसे घेऊन संशयित सचिन चिखले यांना दिले होते. मात्र, दोन वर्ष उलटून देखील पैसे परत मिळत नसल्याने त्यांनी नाशिकच्या राजरत्ननगर येथे राहणाऱ्या मामेभावाच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. माझ्या आत्महत्येस सचिन चिखले हे जबाबदार आहेत, असा मजकूर देखील त्यांनी चिठ्ठीत लिहिला आहे. सध्या सचिन चिखले हा फरार असून नाशिक पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तर पैसे घेतलेल्यांकडून सुरू असलेला दबाव आणि नोकरीचे आमिष दाखवून केलेली फसवणूक यामुळे प्रवीण सोनवणे यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी म्हटले आहे.
संशयित जीएसटी विभागाचा कर्मचारी
दरम्यान, संशयित सचिन चिखले हा जीएसटी विभागात कर्मचारी असल्याची माहिती असून त्याचा शोध नाशिक पोलीस घेत आहे. सचिन चिखले याने प्रवीण सोनवणे यांच्यासह आणखी किती लोकांची फसवणूक केली आहे? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. आत्महत्येपूर्वी प्रवीण सोनवणे यांनी लिहिलेली चिठ्ठी आणि त्यांचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला असून अंबड पोलीस पुढील तपास करत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या























