Nashik Crime : जेवणाची ऑर्डर लवकर देत नाही म्हणून हवेत गोळीबार, नाशिकमध्ये सिनेस्टाईल पाठलाग करत चौघांना बेड्या
हरसूल येथे एका हॉटेलात मद्यधुंद अवस्थेत जेवणासाठी गेलेल्या नाशिकसह परजिल्ह्यातील चार सराईत गुंडांनी सात राऊंड हवेत फायर करून पळ काढला. पोलिसांनी चार संशयितांना जेरबंद केले आहे.
Nashik Crime नाशिक : हरसूल (Harsul) येथे एका हॉटेलात मद्यधुंद अवस्थेत जेवणासाठी गेलेल्या नाशिकसह परजिल्ह्यातील चार सराईत गुंडांनी गावठी पिस्तुलातून सात राऊंड हवेत फायर (Firing) करून नाशिककडे (Nashik News) पळ काढला. ही माहिती कळताच गंगापूर पोलिसांनी नाकाबंदी करून भरधाव इनोव्हा कार अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, संशयितांनी पोलिसांना (Police) न जुमानता पळ काढला. यानंतर चोर आणि पोलिसांचा खेळ सुरू झाल्यावर पळून जाणाऱ्या चौघा सराईतांचा पाठलाग करून गावठी पिस्तुलासह गजाआड करण्यात यश आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, इम्रान अयनूर शेख (25, रा. गणेशचौक, संजीवनगर, अंबड लिंकरोड, नाशिक), शेखर दिलीपराव कथले (29, रा. शिवाजीनगर ता. सेलू, जि. परभणी), अरबाज शब्बीर खान पठाण (23, रा. डिग्रसवाडी, सेलू, जि. परभणी) व राहुल श्याम क्षत्रिय (24, रा. साईबाबा मंदिराच्या बाजूला, संत जनार्दननगर, नांदूरनाका, नाशिक) अशी अटक केलेल्या सराईत संशयितांची नावे आहेत.
हवेत सात राऊंड केले फायर
याबाबत अधिक माहिती अशी की, हरसूल येथील हॉटेल कश्यपी फोर्ट येथे चौघेही संशयित मद्य पिऊन जेवण करण्यासाठी आले. त्यांनी हॉटेलात ऑर्डर देऊन जेवण केले. यानंतर काहीतरी ऑर्डर दिल्यावर ती लवकर का आणली नाही, यातून वाद घालत एकाने जवळील गावठी पिस्तुलातून हॉटेलचा मॅनेजर आणि वेटरच्या समोर सात राऊंड हवेत फायर केले.
चौघे इनोव्हातून पसार
त्यानंतर धाकाने चौघे इनोव्हात बसून नाशिकच्या दिशेने पळाले. ही माहिती हरसूल पोलिसांना कळविण्यात आली. त्यांनी गुन्ह्याचा तपास करताना गंगापूर पोलिसांना संशयित नाशिकमार्गे येत असल्याची माहिती दिली. त्यानुसार गंगापूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी डीबीचे उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, हवालदार रवींद्र मोहिते, गणेश रेहरे, सचिन काळे आदींना नाकाबंदीसह संशयितांना पकडण्याचे आदेश दिले.
चौघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
त्यानुसार, एमएच 20 सीए 9595 ही संशयास्पद इनोव्हा गिरणारे येथून गंगापूर रोडकडे येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने गंगापूर जकात नाक्याजवळ इनोव्हा थांबविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा संशयित चालकाने कार न थांबविता पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी डीबी मोबाइल कारने पाठलाग करून इनोव्हा गंगापूर गाव जकात नाक्याजवळ अडविली. तेव्हा चौघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा पाठलाग करून पकडण्यात आले. या कारवाईत इनोव्हा कार, एक पिस्तूल हस्तगत करण्यात आली आहे.
आणखी वाचा