(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Crime : भांडण सोडवायला गेला अन् तरुणानं हकनाक जीव गमावला, नाशिकमधील धक्कादायक घटना
Nashik Crime News Updates : नाशिकमध्ये मित्राच्या घरच्यांचे भांडण सोडायला गेलेल्या तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
Nashik Crime News Updates : नाशिकमध्ये क्षुल्लक कारणावरून खुनाच्या घटना काही थांबायचे नाव घेत नाही आहे. पुन्हा एकदा नाशिकमध्ये मित्राच्या घरच्यांचे भांडण सोडायला गेलेल्या तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
सागर राऊत असे तरुणाचे नाव आहे. नाशिक शहरातील शिवाजी वाडी येथे सागरचा मित्र राहतो. मित्राच्या कुटुंबियांचे शेजारच्या कुटुंबासोबत भांडण सुरू होते. यावेळी सागर त्या ठिकाणी भांडण सोडविण्यास गेला. याचा राग मनात ठेवत सागरावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सागर गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रक्तस्त्राव अधिक झाल्याने उपचार सुरू असताना सागरचा मुत्यू झाला आहे. याबाबत मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान घटनेत क्षुल्लक कारणावरून तरुणाला जीव गमवावा लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याआधी देखील नाशिकमध्ये भांडण सोडायला गेलेल्या म्हसरुळ येथील तरुणांची हत्या करण्यात आली होती. तर पुण्यावरून आलेल्या इसमाचा गाडीचा धक्का लागला या कारणावरून हत्या करण्यात आली होती.
या संपूर्ण घटना पाहता नाशिकमध्ये किरकोळ कारणावरून थेट खूनाच्या घटनांमध्ये वाढ झाली असून पोलिसांचा वचक कमी झाला का? गुन्हेगारांना कायद्याचे भय आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या