Aurangabad: दोन महिन्याच्या गर्भवती महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; घटनेनंतर सासर-माहेरचे भिडले
सासर-माहेरच्या लोकांमध्ये झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर घाटीतील शवविच्छेदनगृह बाहेर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
Aurangabad Crime News: औरंगाबाद शहरातील वाळूज भागातील बजाजनगर परिसरात धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 24 वर्षीय गर्भवती विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. जयश्री रितेश पाटील ( वय 24, रा. बजाजनगर वाळूज ) असे मृत विवाहितेचे नाव आहे. तर मृत विवाहितेचे मृतेदह रुग्णालयात आणल्यानंतर महिलेच्या सासर-माहेरच्या लोकांमध्ये जोरदार हाणामारी पाहायला मिळाली.
याबाबत अधिक माहिती अशी की, जयश्री यांचे वर्षभरापूर्वी लग्न झाले होते. त्या दोन महिन्यांच्या गर्भवती होत्या.दरम्यान आज पहाटे साडेपाच वाजता जयश्री यांनी राहत्याघरी फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. जयश्री यांनी गळफास घेतल्याचे लक्षात येताच पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जयश्री यांना फासावरून खाली उतरवत घाटी रुग्णालयात हलविले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
सासर-माहेरच्या लोकांमध्ये मारहाण...
जयश्री यांनी गळफास घेतल्याची माहिती काही वेळेत जवळ्याचा नातेवाईकांना कळाली. त्यामुळे नातेवाईकांनी मोठ्या संख्येने घाटी रुग्णालयातील शवविच्छेदनगृह बाहेर गर्दी केली. तर यावेळी आलेल्या सासर-माहेरच्या लोकांमध्ये वाद झाला आणि दोन्हीकडील लोकं आपापसात भिडले. पाहता-पाहता दोन्ही गटात तुफान हाणामारी सुरु झाल्याचं पाहायला मिळाले. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत वाद मिटवला.
गुन्हा दाखल करण्याची मागणी...
जयश्री यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच त्यांच्या माहेरच्या लोकांनी घाटी रुग्णालयात धाव घेतली. यावेळी त्यांनी जयश्री यांची आत्महत्या नसून घातपात झाला असल्याचा आरोप केला. त्यामुळे सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सुधा यावेळी जयश्री यांच्या माहेरच्या लोकांनी केली. त्यामुळे दोन्ही गटात वाद झाल्याचे पाहायला मिळाले.
पोलिसांचा बंदोबस्त...
घाटीत आलेल्या सासर-माहेरच्या लोकांमध्ये सुरवातीला बोलाबाली झाली. त्यांनतर दोन्ही गटाकडून थेट हाणामारी सुरु झाली. दोन गटात हाणामारी सुरु असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनतर वाद मिटवण्यात आला. तर खबरदारीचा उपाय म्हणून शवविच्छेदनगृह बाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.