Nashik Crime News: त्र्यंबकेश्वर मंदिरात 3000 रुपयांत 'व्हीआयपी' दर्शन, शरद पवार गटाच्या नेत्याला बेड्या; पोलिसांच्या स्टिंग ऑपरेशनची A टू Z स्टोरी
Nashik Crime News: भाविकांना अवघ्या 10 मिनिटांत दर्शनाचे आमिष दाखवून 3 हजार रुपये उकळणाऱ्या टोळीचा नाशिक ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

Nashik Crime News: बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या (Trimbakeshwar Temple) पावित्र्याला धक्का लावणारा प्रकार समोर आला आहे. दर्शनासाठी तासनतास रांगेत उभे असलेल्या भाविकांची अडवणूक करून अवघ्या 10 मिनिटांत दर्शनाचे आमिष दाखवून 3 हजार रुपये उकळणाऱ्या टोळीचा नाशिक ग्रामीण पोलिसांनी (Nashik Police) पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण गैरव्यवहाराचे धागेदोरे थेट देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तापर्यंत पोहोचले असून, पोलिसांनी विश्वस्त आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते पुरुषोत्तम कडलग (Purushottam Kadlag) आणि गोटीराम पेहरे या दोघांना अटक केली आहे.
Nashik Crime News: असं राबवलं पोलिसांनी 'स्टिंग ऑपरेशन'
गेल्या अनेक दिवसांपासून त्र्यंबकेश्वरमध्ये पैसे घेऊन दर्शन दिले जात असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे येत होत्या. या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी एक 'स्टिंग ऑपरेशन' (Sting Operation) राबवले. यामध्ये पोलीसच भाविक बनून गेले होते. केवळ एका दिवसात तीन वेगवेगळ्या भाविकांकडून प्रत्येकी तीन हजार रुपयांची लूट होत असल्याचे पुराव्यासह उघड झाले. या कारवाईत एका एजंटला ताब्यात घेतल्यानंतर त्याने दिलेल्या माहितीनुसार, या लुटीचे कनेक्शन विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांच्याशी असल्याचे समोर आले.
Nashik Crime News: 7 दिवसांची पोलीस कोठडी
पुरुषोत्तम कडलग यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला की, त्र्यंबकेश्वर देवस्थानची व्याप्ती मोठी असून या प्रकरणाचा तपास करणे गरजेचे आहे. विश्वस्त पदाचा गैरवापर करून हे रॅकेट चालवले जात असल्याचा संशय आहे, त्यामुळे 10 दिवसांची कोठडी द्यावी. दुसरीकडे आरोपीच्या वकिलांनी हा दावा फेटाळून लावला. मात्र, न्यायालयाने प्रकरणाचे गांभीर्य ओळखून कडलग यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
Nashik Crime News: राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
पुरुषोत्तम कडलग हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे युवक कार्याध्यक्ष असल्याने या प्रकरणाला राजकीय वळणही लागले आहे. भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी यावर कडाडून टीका केली. "शरद पवारांनी नास्तिक विचारांचे कार्यकर्ते घडवल्यानेच देवस्थानात असा भ्रष्टाचार सुरू आहे," असा घणाघात त्यांनी केला.
Nashik Crime News: विश्वस्त निवड प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह?
या कारवाईनंतर त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी खळबळजनक आरोप केला आहे. "विश्वस्त निवड प्रक्रियाच आर्थिक व्यवहारातून झाली असून, कडलग यांच्यासह तिघांनी कोट्यावधी रुपये देऊन हे पद मिळवले आहे," असा दावा त्यांनी केला. या प्रकरणाची व्याप्ती पाहता केवळ दर्शन घोटाळाच नव्हे, तर विश्वस्त निवड प्रक्रियेचीही चौकशी व्हावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
आणखी वाचा






















