17 सायलन्सर चोरले, सर्वच्या सर्व मारुती Ecco कारचे सायलन्सर, चोरट्यांचं कारण ऐकाल तर चक्रावून जाल!
एकट्या नाशिक शहरातच गेल्या दोन महिन्यात जवळपास 17 ईको कारचे सायलन्सर लंपास झाल्याने पोलीस चक्रावून गेले होते. फक्त याच कारच्या सायलेन्सरवर चोरांची वक्रदृष्टी का होती ? त्यांची मोडस ऑपरेंडी नक्की काय होती ? असा प्रश्नही पोलिसांना पडला होता.
Nashik Crime News : मारुती ईको कारचे सायलन्सर चोरी करणाऱ्या एका टोळीच्या नाशिक पोलिसांनी (police) मुसक्या आवळल्या आहेत. एकट्या नाशिक शहरातच गेल्या दोन महिन्यात जवळपास 17 ईको कारचे सायलन्सर (maruti eeco car silencer ) लंपास झाल्याने पोलीस चक्रावून गेले होते. फक्त याच कारच्या सायलेन्सरवर चोरांची वक्रदृष्टी का होती ? त्यांची मोडस ऑपरेंडी नक्की काय होती ? असा प्रश्नही पोलिसांना पडला होता.
सायलन्सर चोरीच्या अनोख्या प्रकारामुळे गेल्या दोन महिन्यांपासून नाशिक पोलिसांची डोकेदुखी वाढली होती. विशेष म्हणजे फक्त मारुती ईको कारचेच एकामागे एक सायलन्सर चोरी होत असल्याने हा चर्चेचा विषय ठरला होता. दरम्यान याप्रकरणी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एका पथकाची स्थापना करत या चोरांचा शोध सुरु केला होता. पोलीसांच्या हाती आलेल्या दोन सीसीटीव्ही फुटेजनूसार चोरटे आधी ईको कारची रेकी करायचे त्यानंतर रात्री वाहनमालक साखरझोपेत असताना अवघ्या पाच मिनिटात नटबोल्ट खोलत सायलन्सर लंपास करत होते. सिडको परिसरातील केवल पार्कमध्ये राहणाऱ्या अमोल येवले या मसाला व्यावसायिकाच्या इको गाडीचे अशाच प्रकारे चोरटयांनी सायलन्सर गायब केले. नविन सायलन्सर बसवण्यासाठी त्यांना तब्बल 86 हजार रुपये एवढा खर्च आला होता.
दरम्यान येवले यांनी अंबड पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनूसार पोलिसांचा तपास सुरु होता. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अमळनेर, धुळे आणि जळगाव गाठत एकूण सात जणांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या. यातील दोघेजण हे उत्तर प्रदेशचे रहिवासी असून अमळनेरचा मनीष महाजन हा टोळीचा मास्टरमाइंड होता. मनीष हा एका गॅरेजमध्ये काम करत असल्याने मारुती इको गाडीच्या सायलन्सरमध्ये धूर फिल्टर होण्यासाठी पॅलेडियम आणि प्लॅटिनियमसारखे धातू असते. जे दुर्मिळ, माऊ आणि चांदीसारखे असते. ते विकल्यास त्याचे चांगले पैसे मिळतात हे त्याला माहीत होते. त्यामुळे मनीषने नाशिकच्या एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या आपल्या जून्या मित्रांना हाताशी धरत सायलन्सर चोरी करण्याचा नवा धंदा सुरु केला होता. सायलन्सर चोरी करताच त्यातील प्लॅटिनम धातू सदृश्य पदार्थ ते काढायचे आणि उत्तर प्रदेशच्या असलम खैराती खान आणि प्यारेलाल फिरात अली या आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने विक्री करायचे.
या टोळीने गेल्या दोन महिन्यात एकट्या नाशिक शहरातच 17 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. नाशिकसह इतर जिल्ह्यातही त्यांनी अजून किमान ३० ते ३५ वाहनांचे सायलेन्सर चोरी केल्याची शक्यता आहे. या टोळीचे अजून कोणी साथीदार आहेत का ? सायलेन्सर मधील धातू ते कोणाला विक्री करत होते ? या आणि ईतर सर्व बाबींचा नाशिक पोलीस सध्या तपास करत आहेत.