Nashik Crime : नाशिक शहरात पुन्हा सशस्त्र दरोडा, 65 वर्षीय वृद्धाला दरोडेखोरांनी संपवलं!
Nashik Crime : नाशिक शहरातील अंबड लिंक रोड परिसरात दरोडा पडल्याची घटना घडली आहे. या दरोड्यात 65 वर्षीय वृद्धाचा खून करण्यात आला. दरोडेखोरांनी घरातील ऐवज लुटून पोबारा केला.
Nashik Crime : नाशिकसह (Nashik) जिल्ह्यात दरोड्याचे सत्र सुरुच असून शहरातील अंबड लिंक रोड परिसरात दरोडा (Robbery) पडल्याची घटना घडली आहे. या दरोड्यात 65 वर्षीय वृद्धाचा खून करण्यात आला येऊन दरोडेखोरांनी पोबारा केला आहे.
गेल्या काही दिवसांत नाशिक शहरासह ग्रामीण भागात वाढत्या दरोड्याचा घटनांनी नागरिक दहशतीखाली आहेत. शिवाय वाढत्या घरफोड्यांनी शहरात दरोडेखोरांची टोळी सक्रिय असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. दरम्यान शहरातील अंबड औद्योगिक वसाहतीतील एक्स्लो पॉईंट येथे दरोडेखोरांनी लूटमार करुन 65 वर्षीय वृद्धाचा खून केल्याची घटना घडली आहे.
दरम्यान अंबड लिंकरोड परिसरात कर्डिले कुटुंब वास्तव्यास आहे. काल (25 नोव्हेंबर) सायंकाळी कर्डिले यांच्या घरातील इतर सदस्य बाहेर गेले होते. जगन्नाथ कर्डिले हे घरात एकटेच असताना अचानक दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. कर्डिले यांना कुणीतरी आल्याची कुणकुण लागताच, त्यांनी बाहेर येऊन पाहिले तर तोंड बांधलेले काही दरोडेखोर असल्याचे समजले. कर्डिले यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. मात्र दरोडेखोरांनी त्यांच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यासह दरोडेखोरांनी कर्डिले यांच्या घरातील सुमारे सहा ते सात लाखांची रोकड लंपास केल्याचे समजते.
चाळीस दिवसात पाच घटना
दरम्यान नाशिक शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांत दरोड्याच्या घटना घडत आहेत. कालच सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा येथे सशस्त्र दरोड्याची दुसरी घटना घडली. शहरासह जिल्ह्यात दरोड्याच्या घटनांचे सत्र सुरुच आहे. साधारण चाळीस दिवसात दरोड्याच्या चार घटना उघडकीस आल्या आहेत. सिन्नरच्या नांदूरशिंगोटे येथे देखील सशस्त्र दरोड्याची घटना घडली होती. नाशिक ग्रामीण पोलिसांनी याची उकल अनेक दिवसांनंतर केली. तर काही दिवसांपूर्वी दिंडोरी तालुक्यातील ढकांबे परिसरात कुटुंबियांना बंदुकीचा धाक दाखवून जबरी लूट केली होती. अद्यापही या लुटीची उकल झाली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एकदा नाशिकसह ग्रामीण भागातील दरोड्याच्या घटनांकडे गांभीर्याने बघणे आवश्यक असल्याचे या घटनांवरुन दिसून येत आहे.
नाशिकचे पोलीस काय करत आहेत, नागरिकांचा संतप्त सवाल
दरम्यान सलग दोन दिवस दरोड्याच्या घटना घडल्याने दरोडोखोरांनी पोलिसांना पुन्हा आव्हान दिलं आहे. इतकंच नाही नाशिक शहर आणि ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. नाशिकचे पोलीस काय करत आहेत, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
संबंधित बातमी
Nashik Crime : सेलोटेपने हातपाय बांधले, मग जबर मारहाण केली, सिन्नरच्या वडगाव पिंगळ्यात सशस्त्र दरोडा