Nashik Crime News : नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, बिहारच्या सात जणांविरोधात गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
Nashik Crime News : नाशिक येथील करन्सी नोट प्रेसमध्ये झालेल्या भरती प्रक्रियेत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Nashik Crime News : नाशिक येथील करन्सी नोट प्रेसमध्ये (Currency Note Press) झालेल्या भरती प्रक्रियेत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या परीक्षेत काही उमेदवारांनी फसवणूक करून, डमी परीक्षार्थी बसवून आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पवई पोलीस (Powai Police Station) ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हे सर्व आरोपी मूळचे बिहार (Bihar) राज्यातील रहिवासी आहेत.
करन्सी नोट प्रेसमध्ये कनिष्ठ टेक्निशियन (मुद्रण/नियंत्रण), कनिष्ठ टेक्निशियन (कार्यशाळा/इलेक्ट्रीकल) आणि पर्यवेक्षक या पदांसाठी 13 मार्च 2022 ते 4 मार्च 2023 या कालावधीत भरती परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत सात जणांनी संगनमत करून डमी परीक्षार्थींना परीक्षा केंद्रावर पाठवले. या डमी उमेदवारांनी त्यांच्या जागी परीक्षा दिली आणि उत्तीर्णही झाले.
बनावट कागदपत्रांचा वापर
परीक्षा पास झाल्यानंतर, आरोपींनी बनावट आयटीआय प्रमाणपत्रे आणि विद्युत अभियांत्रिकीतील (इलेक्ट्रीकल) डिप्लोमाची बनावट कागदपत्रे सादर करत नोकरी मिळवली. या फसवणुकीचा प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आल्यानंतर प्रकरण झिरो एफआयआरच्या स्वरूपात मुंबईतील पवई पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आले.
कोण आहेत आरोपी?
या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सात जणांची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
1. रवी रंजन कुमार
2. संदीप कुमार
3.शिशुपाल कुमार
4. आयुष राज
5. राजीव सिंग
6. संदीप कुमार (दुसरा आरोपी)
7. आशुतोष कुमार
या सर्व आरोपींचा शोध सुरू असून, पोलिस विविध राज्यांत शोधमोहीम राबवत आहेत.
पुढील तपास सुरु
पवई पोलिसांनी या प्रकरणात फसवणूक, बनावट कागदपत्र तयार करणे आणि त्याचा वापर करणे अशा विविध गंभीर कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन या टोळीचा किंवा रॅकेटचा छडा लावण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरु आहे.
वर्गणीच्या वादातून अल्पवयीन युवकावर कोयत्याने हल्ला
दरम्यान, भद्रकाली परिसरातील नानावली गोठ्याजवळ केवळ 10 रुपयांच्या वर्गणीवरून सुरू झालेला किरकोळ वादाचे रूपांतर गंभीर हाणामारी झाले. काल रात्रीच्या सुमारास रजा फिरोज शेख (16) या अल्पवयीन युवकावर टोळक्याने एकत्रित येत थेट गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले. हल्ला इतका जबरदस्त होता की, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रजाला नागरिकांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र डॉक्टरांनी प्रकृती अधिकच गंभीर असल्याचे सांगत पुढील उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हलवले आहे. रजाची स्थिती चिंताजनक असून, सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेमुळे भद्रकाली परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. भद्रकाली पोलिसांनी हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आणखी वाचा























