Nashik Crime : नाशिकमध्ये वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला अन् तृतीयपंथीयांचा धुडगूस; हातात कोयता घेऊन हल्ला, पोलिसांचा मात्र कानाडोळा
Nashik Crime : नाशिक शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला आणि तृतीयपंथीयांनी धुडगूस घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Nashik Crime : नाशिक शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला आणि तृतीयपंथीनी धुडगूस घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हातात कोयता घेऊन तरुणांवर हल्ला करणारा आणि तरुणाकडून दगडफेक करण्याचा प्रयत्न करणारा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. शहराच्या मध्यवस्तीत असणाऱ्या त्र्यंबकनाका (Trimbak Naka) परिसरात ही घटना घडली आहे. या परिसराजवळ असणाऱ्या आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयासमोर सुरू असणाऱ्या आंदोलनाच्या बंदोबस्तमधील पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतल्यानं मोठा अनर्थ टळला. (Nashik Crime News)
गेल्या अनेक महिन्यांपासून सीबीएस चौक, त्र्यंबकनाका परिसरात रात्रीच्या वेळी वेश्या व्यवसाय जोमात सुरु असल्याची नागरिकांची तक्रार आहे. रस्त्यावरच ग्राहकांना बोलावून अनैतिक व्यवहार सुरू असल्याने या भागातील रहिवासी आणि व्यापारी त्रस्त झाले आहेत. पोलिसांकडे वारंवार तक्रारी देऊनही ठोस कारवाई होत नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये असंतोष आहे.
पोलीस काय कारवाई करणार?
काही नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पोलीस याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे आणि कोयता घेऊन हल्ला करण्याची वेळ आली आहे. या घटनेनंतर पोलीस यापुढे काही कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणेकडून या भागात सतत गस्त आणि तपासणी मोहिमा राबवण्याची मागणी देखील जोर धरू लागली आहे.
Nashik Crime : चालत्या रेल्वेत प्रवाशांना लुटणारे तीन आरोपी जेरबंद
दरम्यान, चालत्या रेल्वेमध्ये प्रवाशांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या तीन आरोपींच्या इगतपुरी लोहमार्ग पोलिसांनी मुसक्या आवळल्या. पकडण्यात आलेल्या आरोपींकडून पाच लाख 33 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यात समीर जनार्दन घोडविंदे (20, रा. खडवलो, ता. कल्याण, जि. ठाणे), रोशन अरुण उबाळे (23, रा. पंचशीलनगर, कसारा), करण भीमराव भालेराव (19, रा. संभाजीनगर, आसनगाव) या तिघांना अटक केली आहे.
शुक्रवारी (दि. २५) या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता, एका आरोपीला न्यायालयीन कोठडी देण्यात आली. उर्वरित दोघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली. संबंधित आरोपींकडून दोन लाख 94 हजार 517 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व दोन लाख 20 हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकल, असा पाच लाख 33 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई लोहमार्ग महाराष्ट्र मुंबईचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे, छत्रपती संभाजीनगरच्या लोहमार्ग पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय लोहकरे तसेच रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त ऋषी शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली लोहमार्ग सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी शेंडगे, सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक एस. आर. मिना यांनी केली आहे.
आणखी वाचा























