धक्कादायक! चाईल्ड पॉर्नोग्राफीत नाशिकमध्ये एकाच वेळी 357 जणांवर गुन्हा दाखल; मेटानेच दिली माहिती
Nashik Crime : मेटा कंपनीकडून भारत सरकारला वेगवेगळ्या राज्यांमधील चाईल्ड पॉर्नोग्राफीच्या कृत्य करणाऱ्या प्रोफाइल धारकांची माहिती पुरवण्यात आली आहे.

Nashik Crime : सायबर गुन्ह्यांमधील (Cyber Crime) विविध घटना आणि तक्रारी सायबर पोलिसांपर्यंत पोहोचतात. मात्र, थेट मेटा (Meta) कंपनीकडून भारत सरकारला वेगवेगळ्या राज्यांमधील चाईल्ड पॉर्नोग्राफीच्या कृत्य करणाऱ्या प्रोफाइल धारकांची माहिती पुरवण्यात आली आहे. या आता नाशिक सायबर पोलीस देखील चाईल्ड पॉर्नोग्राफी प्रकरणी गांभीर्याने तपास करत आहेत. या प्रकरणी नाशिकमध्ये एकूण 357 जणांविरोधात सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ आणि छायाचित्र सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या साईट्सद्वारे स्वतःच्या प्रोफाईल वरून प्रसारित केल्याप्रकरणी नाशिकमधील सुमारे 357 प्रोफाईल धारकांवर राज्य सरकारकडून प्राप्त झालेल्या टीप लाईनमधील माहितीच्या आधारे सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. चाईल्ड पॉर्नोग्राफी हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा ठरतो. अल्पवयीन मुलामुलींची अश्लील छायाचित्र किंवा व्हिडिओ समाज माध्यमांद्वारे प्रसारित केल्यास किंवा डाऊनलोड केल्यास ही कृत्य चाईल्ड पॉर्नोग्राफीच्या प्रकारात समाविष्ट होतात आणि सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या साईटवर स्वतःच्या प्रोफाईलवरून वेगवेगळ्या ठिकाणी व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर अशा इंटरनेट आयपी ऍड्रेस वरून प्रसारित केल्या जातात. मेटा कंपनीकडून भारत सरकारला वेगवेगळ्या राज्यांमधील अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या विकृतींची माहिती पुरवण्यात आली आहे. त्यानंतर आता नाशिक सायबर पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.
357 प्रोफाइल धारकांची माहिती तपासणार
चाईल्ड पॉर्नोग्राफीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची विक्री होऊन व्यापार केला जातो. चाईल्ड पॉर्नोग्राफीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी असल्याने अशा पद्धतीच्या प्रकारात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. नाशिक सायबर पोलिसांकडून 357 प्रोफाइल धारकांची माहिती तपासली जात आहे आणि त्यानंतर लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.
लहान मुलांचे फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकू नये
भारतामध्ये लहान मुलांचे नग्न फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले जातात आणि त्यानंतर चाईल्ड पॉर्नोग्राफी वाढण्यास त्याची मदत होते. त्यामुळे अशी कोणत्याही प्रकारचे लहान मुलांचे फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकू नये किंवा पोस्ट करू नये, असे आवाहन सायबर पोलिसांकडून केले जात आहे. मात्र, चाईल्ड पॉर्नोग्राफीच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सायबर पोलिसांच्या तपासात नेमकं काय निष्पन्न होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा























