Nanded Crime : नांदेडमध्ये आईने पोटच्या चिमुकल्यांचा निघृण खून करुन मृतदेह जाळले; तिघे अटकेत
हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आईनेच पोटच्या दोन चिमुकल्यांचा निघृण खून करुन त्यांचे मृतदेह जाळले. या प्रकरणी महिलेसह तिची आई आणि भावाला अटक केली आहे.
नांदेड : आईनेच सहा मुलांना विहिरीत ढकलून खून केल्याची घटना ताजी असताना नांदेडमध्येही अशीच घटना समोर आली आहे. एका महिलेने पोटच्या दोन मुलांचा निर्घृण खून करुन त्यांचे मृतदेह जाळले. मन सुन्न करणारी घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे. या प्रकरणी संबंधित महिला, तिचा भावासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
'माता न तू वैरिणी' याचा प्रत्यय भोकर तालुक्यातील पांडुरणा इथे आला. एका निर्दयी आईने दोन चिमुकल्यांचा खून करुन मृतदेह जाळल्याची मन हेलावणारी घटना घडली. इतकंच नाही तर आई आणि भावाच्या मदतीने पुरावा नष्ट केला. या प्रकरणी भोकर पोलीसा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोकर शहरापासून जवळच असणाऱ्या पांडुरणा इथल्या धुरपताबाई गणपत निमलवाड (वय 30 वर्षे) असं प्रमुख आरोपी महिलेचं नाव आहे. ही आरोपी महिला पांडुरणा इथल्या शेत शिवारात आखाड्यावर पती, दोन वर्षीय मुलगा आणि अवघ्या चार महिन्याच्या मुलीसह वास्तव्यास होती. तर इतर कुटुंबीय म्हणजचे सासू-सासरे आणि अन्य दोघे जण दुसऱ्या ठिकाणी शेतात वास्तव्यास होते. आरोपी महिला धुरपताबाई निमलवाडने 31 मे ते 1 जून सायंकाळी सहा वाजताच्या कालावधीत मुलगा दत्ता गणपत निमलवाड (वय दोन वर्षे) आणि मुलगी अनुसया गणपत निमलवाड (वय 4 महिने) या दोघांचा पांडुरणा शिवारात खून केला. त्यानंतर आरोपी महिलेने आपली आई कोंडाबाई पांडुरंग राजेमोड आणि भाऊ माधव पांडुरंग राजेमोड (दोघे रा. ब्राह्मणवाडा ता. मुदखेड) यांच्या मदतीने दोन्ही मृत लेकरांचे प्रेत जाळून पुरावा नष्ट केला.
दरम्यान आरोपी आईने असं कृत्य का केलं हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. याबाबत गोविंद दगडुजी निमलवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरुन आरोपी धुरपताबाई गणपत निमलवाड, कोंडाबाई पांडुरंग राजेमोड, माधव पांडुरंग राजेमोड आदी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली असून पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पाटील तपास करत आहेत. दरम्यान आईनेच पोटच्या गोळ्यांशी असं कृत्य केल्याने जिल्ह्यात मात्र खळबळ उडाली आहे.