Nalasopara Crime : पोलिसांच्या जाचाला कंटाळून बिल्डरची आत्महत्या, बिल्डिंग घशात घालण्यासाठी खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची दिली होती धमकी
Nalasopara Builder Suicide : मयत बिल्डरने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली. त्यामध्ये पोलिस कर्मचारी शाम शिंदे आणि राजेश महाजन हे आपल्या मृत्यूसाठी जबाबदार असल्याचं सांगितलं.

मुंबई : पोलिसांच्या जाचाला कंटाळून नालासोपाऱ्यातील एका बांधकाम व्यवसायिकाने आत्महत्या केल्याची घटना घडली. जयप्रकास चौहान असं त्या बिल्डरचं नाव असून त्याने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली. त्यामध्ये त्याने शाम शिंदे आणि राजेश महाजन या पोलिस कर्मचाऱ्यांचे नाव लिहून तेच मृत्यूसाठी जबाबदार आहेत असं सांगितलं. या घटनेने नालासोपारामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
चार फ्लॅट्सचा ताबा लिहून घेतला
नालासोपारा पूर्वेकडील संयुक्त नगर येथे मयत जयप्रकाश चौहान यांनी ओम श्री दर्शन ही इमारत पुनर्विकासासाठी घेतली होती. त्या बांधकामासाठी पोलिस शिपाई श्याम शिंदे याने त्याच्या नातलगाच्या माध्यमातून 50 लाखांचे फायनान्स केलं होतं. एका वर्षात दुप्पट रक्कमेच्या आश्वासनावर त्याने पैसे दिले होते. तसेच जामीन म्हणून चार फ्लॅटचा ताबाही लिहून घेतला होता.
बिल्डरकडे पैशासाठी तगादा
इमारत बांधकामास एक वर्षाहून अधिक वेळ झाल्याने पोलिस शिपाई शाम शिंदे आणि त्याचा सहकारी राजेश महाजन तसेच मध्यस्थ लाला लजपत यांनी मयत जयप्रकाश चौहान यांच्याकडे पैशाच्या मागणीचा तगादा लावला. जयप्रकाश यांनी 22 लाख ॲानलाईन आणि 10 लाख रोख रक्कम असे मिळून 32 लाख शाम शिंदेला दिल्याचं नातेवाईक आणि मित्रांनी सांगितलं. मात्र तरीही शाम शिंदे आणि त्याचा सहकारी महाजनने जयप्रकाश यांना पैशासाठी त्रास दिला.
खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी
ती बिल्डिंग आता आमची आहे, तू सोडून जा, अन्यथा खोट्या गुन्ह्यांत अडकवणार अशी धमकी शाम शिंदे याने दिल्याचा दावा चौहान कुटुंबीयांनी केला. शाम शिंदेच्या त्रासाला कंटाळून जयप्रकाश चौहान यांनी अखेर मुलाच्या घरी पंख्याला लटकून आत्महत्या केली. आपण पोलिसांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं त्यांनी चिठ्ठीत लिहून ठेवलं आहे.
शाम शिंदे आणि त्याचा सहकारी राजेश महाजन, तसेच मध्यस्त लाला लजपत यांच्यावर कारवाई करावी आणि आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी चौहान कुटुंबीयांनी केली. मयत जयप्रकाश चौहान यांच्या मुलीने या घटनेबद्दल माहिती देताना सांगितलं की, "आपल्या वडिलांनी ही इमारत उभी करण्याचा प्रयत्न केला. पण 35 लाख रुपये देऊन ही बिल्डिंग घशात घालण्याचा प्रयत्न शाम शिंदे याने केला. ही बिल्डिंग आता आमची आहे, तू सोडून जा अशी धमकी शाम शिंदेने दिली. तसेच लाला लजपत याने घरी येऊन आपल्या वडिलांना धमकावले. त्याच्या फोन वरून शाम शिंदेने आपल्या वडिलांना धमकी दिली. त्यामुळेच वडिलांनी आत्महत्या केली. शाम शिंदे, राजेश महाजन आणि लाला लजपत यांच्यावर कारवाई करावी आणि आम्हाला न्याय द्यावा."
ही बातमी वाचा:























