Nagpur Labour Accident : नऊ मजुरांना चिरडणाऱ्या तरुणांची अद्याप रक्ताची तपासणीच नाही; उपमुख्यमंत्र्यांचे आदेश असतानाही कारवाईत दिरंगाई?
Nagpur Labour Accident : रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास निर्जन रस्त्यावर 9 मजुरांना चिरडणाऱ्या आरोपींच्या रक्ताच्या नमुन्यांची अद्याप तपासणी प्रक्रिया पूर्ण न झाल्याची माहिती समोर आली आहे.
Nagpur Accident News नागपूर : नागपूरच्या (Nagpur Accident) दिघोरी टोल प्लाझाजवळ एका मद्यधुंद कार चालकाने फुटपाथवर झोपलेल्या 9 मजुरांना अक्षरक्ष: चिरडत नेलं होतं. ही घटना घडून आज 3 दिवस उलटले असले तरी, अद्याप पोलिसांनी संशयित आरोपी आणि त्याच्या पाच मद्यधुंद मित्रांचे रक्ताचे नमुने प्रादेशिक न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेत (आरएफएसएल) पाठवलेले नसल्याची माहिती पुढे आली आहे. रविवारी मध्यरात्रीच्या काही वेळापूर्वी झालेल्या या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला होता. तर आदिवासी बगडिया कुटुंबातील 7 जण गंभीर जखमी झाले होते. या दुर्घटनेमुळे शहर पुन्हा एकदा हिट अँड रन (Heat And Run) प्रकरणाने हादरले आहे. अशातच हे संशयित आरोपी मद्यधुंद होते का, हा बाबत खुलासा करण्यासाठी रक्तातील अल्कोहोलची पातळी तपासण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण होणे गरजेचे होते. मात्र, अद्याप ही प्रक्रिया पूर्णच झाल्याची माहिती समोर आली आहे.
उपमुख्यमंत्र्यांचे आदेश असतानाही कारवाईत दिरंगाई?
नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय प्रशासनाने रविवारी रात्रीच अपघातानंतर सहाही आरोपींच्या रक्ताचे नमुने पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले होते. मात्र, रक्ताचे नमुने अद्याप तपासणीसाठी प्रादेशिक न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेला देण्यात आलेले नाहीत. विशिष्ट तापमानात नमुने न ठेवल्यास ते खराब होऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अशा दुर्लक्षामुळे आरोपींना कठोर शिक्षेपासून वाचण्यास मदत होऊ शकते, असेही सूत्रांनी सांगितले आहे. विलंबामुळे वाठोडा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात असून ही प्रक्रिया पूर्ण करण्यास दिरंगाई का? असा प्रश्न या निमित्याने उपस्थित केला जात आहे.
या प्रकरणातील आरोपी सहाही मित्र वाढदिवस साजरा करून आनंदोत्सवासाठी बाहेर पडले. तर हुडकेश्वर येथील ढाब्यावर त्यांनी दारूचे सेवन केले. त्यानंतर दिघोरी टोल प्लाझा जवळ आरोपींची कार अनियंत्रित झाल्याने अपघात झाला. त्यात फुटपाथ झोपलेल्या 9 लोकांना चिरडण्यात आले. मद्यधुंद चालकाने घटनास्थळावरून पळून जाण्यापूर्वी झोपलेल्या पीडितांवर दोन वेळा कार मागे-पुढे केल्याने त्यात 7 जण गंभीर जखमीं झाले. तर यात चार अल्पवयीनांचा देखील समावेश आहे.
आरोपींना कठोर शिक्षा होईल- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
परिणामी या घटनेची सखोल चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा होईल, हे सुनिश्चित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. रात्रीची गस्त वाढवून 'ड्रंक अँड ड्राईव्ह'ची मोहीम अधिक तीव्र करावी, असेही देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस प्रशासनाला सांगितले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश असतानाही या तपासात दिरंगाई होत असल्याचे बोलल्या जात आहे. परिणामी अनेक प्रश्न या निमित्याने उपस्थित केले जात आहेत. दुसरीकडे या घटनेमुळे शहरात मात्र प्रचंड खळबळ उडाली असून आता फुटपाथ देखील सुरक्षित नाहीत का? असा प्रश्न या निमित्याने उपस्थित केला जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या