Nagpur Crime News : उपराजधानी नागपूर हादरली! 24 तासांत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांच्या हत्या
Nagpur Crime : राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये 24 तासात दोन जणांच्या हत्याच्या केल्याची घटना समोर आली आहे.

नागपूर : विजयादशमी आणि धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त कडेकोट बंदोबस्त असतानादेखील नागपूर 24 तासांतील दोन हत्यांनी हादरले. एका घटनेत प्रॉपर्टी डीलरची त्याच्याच गेस्टहाऊसमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तर दुसऱ्या घटनेत चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची हत्या करण्यात आली. या घटनांनी पुन्हा एकदा नागपूरमधील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चर्चा सुरू झाली आहे.
प्रॉपटी डीलरची हत्या
तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत मृतक जमील अहमदचे गेस्ट हाऊस आहे. मृतक प्रॉपर्टी डिलिंगची कामेदेखील करायचे. त्यांची मोहम्मद परवेज मोहम्मद हारून याच्यासोबत मागील सहा वर्षांपासून ओळख होती. दोघेही सोबत प्रॉपर्टीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करायचे. काही दिवसांपासून त्याचा जमील यांच्याशी एका प्रॉपर्टीवरून वाद सुरू होता. बुधवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास जमील हे त्यांच्या कर्मचाऱ्यासह गेस्टहाऊसच्या रिसेप्शनवर असताना आरोपी मोहम्मद परवेज तेथे त्याच्या दोन साथीदारांसोबत आला. मग, त्याने प्रॉपर्टीच्या मुद्द्यावरून जमील यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. वाद विकोपाला गेला आणि आरोपीने खिशातून पिस्तुल काढून जमील यांच्यावर गोळी झाडली. गोळी थेट डोक्यात लागल्याने जमील यांचा जागीच मृत्यू झाला. गोळीचा आवाज ऐकून कुटुंबियांनी धाव घेतली. मात्र तोपर्यंत आरोपी फरार झाले होते. जमील यांची पत्नी नाहिदा परवीन जमील अहमद यांनी दिलेल्या तक्रारीवरून तहसील पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
मजुराकडून पत्नीची हत्या
दुसरी घटना सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाली. दिव्या श्यामकिशोर गजाम असे मृतक महिलेचे नाव आहे. ती 10 दिवसा अगोदरच पती श्यामकिशोर गजाम सोबत नागपुरात मजुरीच्या कामासाठी आली होती. श्यामकिशोर तिच्यावर चारित्र्यावरून संशय घ्यायचा. यातूनच मंगळवारी रात्री त्यांच्यात वाद झाला आणि संतापलेल्या श्यामकिशोरने दिव्यावर लोखंडी पाईपने वार करत तिला ठार मारले.
कॉलेजला निघालेल्या तरुणीवर अत्याचार, निर्जनस्थळी झुडपात नेऊन कृत्य
नागपुरातील (Nagpur) वर्धा रोडवर निर्जन रस्त्यावर एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. मुख्य रस्त्यावरुन झाडी झुडूपांच्या निर्जन रस्त्यावरून महाविद्यालयकडे जात असताना अज्ञात आरोपीनं कुऱ्हाडीचा धाक दाखवत पीडित विद्यार्थिनीला झाडी झुडुपात ओढून नेत तिच्यावर अत्याचार केला. 5 ऑक्टोबर रोजी दुपारी 11 ते 1 च्या दरम्यान ही घटना घडली.
























