Nagpur Crime : 'साहेब तुमच्याच मतदारसंघात राहतो, घरच्यांचा मूत्यू झालाय', भाजप आमदाराला भामट्याने गंडवलं
Nagpur News : अपघातात परिवारातील लोक मृत्यूमुखी पडल्याचे सांगून भाजप आमदाराकडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
नागपूर : अपघातात परिवारातील लोक मृत्यूमुखी पडल्याचे सांगून भाजप आमदाराकडून (BJP MLA) 6 हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नागपूर पूर्व विधानसभा क्षेत्राचे भाजप आमदार कृष्णा खोपडे (Krishna Khopde) यांच्या सोबत हा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे भामट्याने तो कृष्णा खोपडे यांच्या मतदारसंघातील रहिवाशी असल्याचे सांगून त्यांची फसवणूक केली आहे. यामुळे नागपूरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी आमदार कृष्णा खोपडे हे मुंबई (Mumbai) येथे असताना त्यांना एक फोन आला. मुंबईजवळ ठाण्यात (Thane) रस्ते अपघातात (Road Accident) परिवारातील दोन सदस्य मृत्युमुखी पडल्याचे भामट्याने त्यांना सांगितले.
आमदार खोपडेंकडे सहा हजारांची फसवणूक
या भामट्याने रुग्णवाहिकेच्या भाड्यासाठी खोपडे यांच्याकडे फोनवर 6 हजार रुपये मागितले. तसेच मी तुमच्या मतदारसंघाचा रहिवासी आहे असेही सांगितले. आपल्याच परिसरातील नागरिक अडचणीत आहे हे विचार करून आमदार खोपडे यांनी मदत म्हणून तातडीने ऑनलाईन 6 हजार हजार रुपये पाठविले. आमदार खोपडे नागपूरला परत आल्यावर संबंधित कुटुंबाची विचारपूस केल्यावर फसवणुकीचा (Online Fraud) प्रकार उघडकीस आला.
पोलिसांकडून तपास सुरु
त्यानंतर आमदार कृष्णा खोपडे यांनी लकडगंज पोलीस स्टेशनमध्ये (Lakadganj Police Station) याबाबत तक्रार दाखल केली. आतापर्यंतच्या पोलीस तपासात आरोपी ठाण्यातील रहिवाशी असल्याचे निष्पन्न झाले असून त्याचे नाव प्रवीण कडू (Pravin Kadu) आहे. या फसवणुकीत त्याचा एक मित्र सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून (Police) आरोपींचा तपास सुरु आहे.
पोलीस कारवाईपासून वाचविण्यासाठी मागितली एक लाखांची खंडणी
देह व्यावसायात अडकलेल्या व्यापाऱ्याला पोलीस कारवाईपासून वाचविण्यासाठी गुंडाच्या पत्नीने चक्क १ लाखाची खंडणी (Extortion) मागितल्याचा प्रकार नागपूरमध्ये उघडकीस आला आहे. पैसे घेतल्यावरही व्यापाऱ्याची सुटका न झाल्याने अखेर त्याच्या पत्नीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी महिलेवर खंडणीचा गुन्हा नोंदविला आहे. रेणुका अमित तिवारी (30 रा. टेंपल बाजार रोड, सीताबर्डी) असे आरोपी महिलेचे नाव असून पोलिसांनी तिला अटक केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
इलेक्ट्रिक बाईकवर वीज कोसळून एकाचा मृत्यू, अवकाळी पावसामुळे गेल्या 24 तासात 5 जणांनी गमावला जीव