Nagpur Crime: 30 कोटींची थकीत बिले; नागपूरचे कंत्राटदार पी. व्ही. वर्मा आत्महत्या प्रकरणात मुख्य कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
वर्धा जिल्ह्यातील एमआयडीसी देवळी, चंद्रपूर आणि नागपूर या ठिकाणी त्यांचे शासकीय काम सुरू होते. या सर्व कामांची एकत्रित थकीत बिले सुमारे 30 कोटी रुपयांची होती.

Nagpur Crime: नागपूरमधून शासकीय कंत्राटदाराने ळेत थकीत बिलाची रक्कम न मिळाल्याने टोकाचं पाऊल उचलत आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली होती. पीव्ही वर्मा असं या कंत्राटदाराचे नाव आहे. जवळपास तीस कोटी रुपयांची त्यांचे थकीत बिल शासनाकडे प्रलंबित होते. त्यामुळे आर्थिक संकटात सापडल्याने त्यांनी आपलं जीवन संपवलं. पी. व्ही. वर्मा यांच्या आत्महत्येच्या प्रकरणानंतर संपूर्ण कंत्राटदार वर्गात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. नागपूर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने याप्रकरणी मुख्य कंत्राटदार एम. बी. पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. वर्मा यांना शासनाकडून थकीत बिलाची रक्कम वेळेत न मिळाल्याने ते गंभीर आर्थिक अडचणीत सापडले होते. याच नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
30 कोटींची थकीत बिले
मिळालेल्या माहितीनुसार, पी. व्ही. वर्मा यांनी एम. बी. पाटील यांच्याकडून उपकंत्राटावर काम घेतले होते. वर्धा जिल्ह्यातील एमआयडीसी देवळी, चंद्रपूर आणि नागपूर या ठिकाणी त्यांचे शासकीय काम सुरू होते. या सर्व कामांची एकत्रित थकीत बिले सुमारे 30 कोटी रुपयांची होती. शासनाकडे ही बिले दीर्घकाळ प्रलंबित राहिल्याने वर्मा यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले. या तणावातूनच त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.
पोलिसांत गुन्हा दाखल
या प्रकरणी नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांकडून सध्या तपास सुरू आहे. मुख्य कंत्राटदार एम. बी. पाटील यांनी वेळेत पैसे न दिल्यामुळेच वर्मा आत्महत्येस प्रवृत्त झाल्याचा आरोप नागपूर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने केला आहे. यामुळे पाटील यांच्यावरही गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. सध्या शासन वेगवेगळी कामे एकत्र करून मोठ्या रकमेची कंत्राटे काढत आहे. अशा परिस्थितीत लहान कंत्राटदारांना थेट काम घेणे कठीण जात असून, त्यांना मोठ्या कंत्राटदारांच्या माध्यमातूनच काम करावे लागते. मात्र यामुळे उपकंत्राटदारांना वेळेत पैसे मिळत नाहीत. परिणामी ते आर्थिक अडचणीत सापडून मानसिक ताणाखाली येत आहेत.
थकीत बिले तब्बल 90 हजार कोटी
महाराष्ट्रभरातील कंत्राटदार संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील विविध विभागांमध्ये मिळून तब्बल 90 हजार कोटी रुपयांची थकीत बिले प्रलंबित आहेत. त्यामुळे संपूर्ण कंत्राटदार वर्ग मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. या पार्श्वभूमीवर वर्मा यांची आत्महत्या ही केवळ वैयक्तिक घटना नसून संपूर्ण व्यवस्थेतील गंभीर त्रुटीचे प्रतिबिंब असल्याचे मानले जात आहे. “थकीत बिले वेळेत न मिळाल्याने अनेक कंत्राटदार मोठ्या आर्थिक संकटात आहेत. शासनाने तात्काळ उपाययोजना करून थकीत रक्कम सोडावी, अन्यथा अशा घटना थांबणार नाहीत,” असा इशारा नागपूर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने दिला आहे.

























