'माझ्या जीवाला धोका, संरक्षण मिळावं', पंच प्रभाकर साईल आयुक्त कार्यालयात, कदमांचे आरोप तर राऊतांकडून पाठिंबा
Drugs Case Update:समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत खळबळ उडवून देणारे पंच प्रभाकर साईल हे आयुक्त कार्यालयात पोहचले आहेत. प्रभाकर साईल यांंच्यावरुन आता भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा वाद सुरू झाला आहे.
मुंबई : क्रूझ पार्टी प्रकरणी गौप्यस्फोट करुन समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत खळबळ उडवून देणारे पंच प्रभाकर साईल हे आयुक्त कार्यालयात पोहचले आहेत. माझ्या जीवाला धोका आहे, त्यामुळं मला संरक्षण मिळावं अशी मागणी प्रभाकर साईल यांच्याकडून करण्यात येतेय. ड्रग्ज प्रकरणात गौप्यस्फोट करणाऱ्या प्रभाकर साईल यांंच्यावरुन आता भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा वाद सुरू झाला आहे. दरम्यान मुंबईचे सहायक पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्याशी प्रभाकर यांची भेट होऊ शकते.
राम कदम म्हणतात, हे षडयंत्र तर राऊत म्हणतात साईल देशभक्त
साईल यांच्या मुलाखतींवर भाजप आमदार राम कदम यांनी प्रश्नचिन्हं उपस्थित केलं आहे. साईलच्या मुलाखती करण्यामागे राज्य सरकारच्या कोणत्या नेत्याचा हात होता आणि कोणाच्या इशाऱ्यावरून या मुलाखती झाल्या असे प्रश्न राम कदम यांनी विचारलेत. एनसीबीला बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे का? असा सवालही कदम यांनी केलाय. दरम्यान हा सॅम हा मुंबईतल्या मनी लाँड्रिंगमधला सर्वात मोठा मासा असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तर, प्रभाकर साईल हा देशभक्त असल्याचं राऊतांनी म्हटलं आहे. राज्याच्या गृहखात्यानं प्रभाकर साईल यांना सुरक्षा पुरवली पाहिजे, असंही राऊत म्हणालेत.
काय म्हणाले होते साईल
आर्यन खान ड्रग्स केसमध्ये मुख्य साक्षीदार असलेल्या किरण गोसावीनं शाहरुख खानकडे 25 कोटींची मागणी केली, त्यात 18 कोटींवर डील झाली, असा खळबळजनक दावा क्रुझ पार्टी प्रकरणातील पंच प्रभाकर साईल यांनी काल दिली होती. एबीपी माझाशी बोलताना एनसीबी रेडचे पंच क्रमांक 1 असलेले प्रभाकर साईल यांनी सांगितलं होतं की, त्यांची या प्रकरणात पंच म्हणून सही घेतली होती. मात्र तो कागद ब्लँक होता. रेडच्या दिवशी किरण गोसावीने त्यांना येलो गेटला बोलवलं आणि त्यानंतर साईल यांनी गोसावीला फोनवर बोलताना ऐकलं. सईल यांनी सांगितलं की, माझ्या जीवाला धोका होता म्हणून मी माझ्या परिचिताकडे सोलापूरला 10-12 दिवस राहिलो, असं त्यांनी म्हटलं होतं.
समीर वानखेडेंकडून मुंबई सत्र न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर
क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात सध्या बाहेर जो प्रकार सुरू आहे. त्याबाबत एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी मुंबई सत्र न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. न्यायाधीश वैभव पाटील यांच्या विशेष एनडीपीएस कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं. गुन्हा क्रमांक 94/21 बाबत चर्चा सुरू आहे. या गुन्ह्याबाबत समाज माध्यमावर सतत चर्चा सुरू आहे. अनेक पंचांची नावं उघड होत आहेत. एनसीबी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर कोर्टाला माहिती देण्यात आली. या गुन्ह्याबाबत सोशल मीडियावर आणि ज्या काही तक्रारी होत आहेत, त्याचा परिणाम या गुन्ह्याच्या तपासावर होऊ नये , कारवाईवर होऊ नये, यासाठी एनसीबीनं पाऊल उचललं आहे.
मला वैयक्तिकरित्या काही जणांकडून लक्ष्य केलं जातंय- वानखेडे
मला वैयक्तिकरित्या काही जणांकडून लक्ष्य केलं जातंय, असंही वानखेडे यांनी कोर्टात सांगितलं आहे. माझ्यावर, माझ्या कुटुंबियांवर सतत आरोप केले जात आहेत. आजही माझे काही खाजगी फोटो लिक करण्यात आलेत. माझ्या आजवरच्या कारकिर्दीत मी कधीही चुकीचा वागलेलो नाही. माझ्यावरील सर्व आरोप निराधार असून मी कोणत्याही चौकशीला सामोरा जायला तयार आहे, अशी साक्ष समीर वानखेडेंनी कोर्टापुढे दिली आहे.