उसने घेतलेले पैसे मागण्यासाठी गेलेल्या महिलेची हत्या, कल्याण पूर्वेतील धक्कादायक घटना
Mumbai Crime News : उसने घेतलेले पैसे मागण्यासाठी गेलेल्या महिलेची आई आणि मुलाने हत्या केली आहे. कल्याण पूर्वेत ही धक्कादायक घटना घडली आहे.
Mumbai Crime News : उसने घेतलेले पैसे मागण्यासाठी गेलेल्या महिलेची आई आणि मुलाने हत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्वेत घडली आहे. रंजना जैस्वार असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आई लालसादेवी राजभर आणि मुलगा विजय राजभर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली आहे.
रंजना यांची हत्या केल्यानंतर लालसादेवी आणि विजय दोघे घराला कुलूप लावून निघून गेले होते. मात्र, आज सकाळी विजय राजभर याने आधारवाडी जेलमध्ये जावून तेथे त्याने केलेले कृत्याबाबत माहिती दिली.तेथून त्याला कोलशेवाडी पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले. कोलशेवाडी पोलीस ठाण्यात त्याने हत्या केल्याची कबुली दिली.
कल्याण पूर्व चक्की नाका परिसरात रंजना जैस्वार ही महिला आपल्या कुटुंबासह राहत होती. रंजना हिचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय होता. तिची याच परिसरात राहणाऱ्या अजय राजभर सोबत मैत्री होती. रंजनाने अजयला काही पैसे उसनवार दिले होते. पैसे घेऊन बराच कालावधी झाला, मात्र अजय पैसे देण्यास टाळाटाळ करत होता. त्यामुळे रंजना ही अजयच्या घरी जाऊन पैसे मागत होती. त्यामुळे अजयच्या कुटुंबीयांसोबत तिचे वाद होत होते.
काल रात्री दहा वाजण्याच्या सुमारास रंजना अजयच्या घरी गेली. त्यावेळी अजय घरी नव्हता, तिने विजय आणि अजयची आई लालसा देवी यांच्याकडे पैशांची मागणी केली. यातून या तिघांमध्ये वाद झाला. संतापलेल्या विजय आणि त्याच्या आईने रंजनावर चाकूने वार करत तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर विजय आणि लालसा देवी घराला बाहेरून कुलूप लावून तेथून निघून गेले. विजय सकाळी आधारवाडी जेल येथे गेला आणि पोलिसांना त्यांने केलेल कृत्य सांगत स्वत:ला अटक करण्याची मागणी केली.
आधारवाडी जेलमधून विजय कोळशेवाडी पोलीस ठाण्यात आला. तेथे त्याने घडलेल्या घटनेबाबत पोलिसांना माहिती देत हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घडलेल्या घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर विजयला ताब्यात घेत दोघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कोलशेवाडी पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्वाच्या बातम्या