मोठी बातमी : नशेखोरांनी विकृतीची हद्द गाठली, शाळेसमोरील मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्याच्या मानेत नशेचं इंजेक्शन टोचलं
शाळेच्या समोरील मैदानात मित्रांसह खेळत असताना इथे नशा करण्यास बसणाऱ्या सहा ते सात जणांनी त्याच्या मानेत मागून येऊन एक इंजेक्शन टोचले.

मुंबई : राज्यात महिला आणि लहानग्यांवरील अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसून येत नाहीत. त्यातच, ड्रग्जमुक्त (Drugs) महाराष्ट्र अभियान बाळगलेल्या महाराष्ट्रात, मुंबईत नशेली पदार्थांची विक्री, आणि सेवन सहजपणे होत असल्याचे दिसून येते. कारण, घाटकोपरच्या (mumbai) बर्वेनगर मध्ये नशेखोरांनी 12 वर्षीय विद्यार्थ्यांच्या मानेत नशेचे इंजेक्शन टोचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यश चौरसिया असे विद्यार्थ्याचे नाव असून तो बर्वेनगर मधील महापालिकेच्या शाळा क्रमांक 3 मध्ये शिक्षण घेत असल्याची माहिती आहे.
शाळेच्या समोरील मैदानात मित्रांसह खेळत असताना इथे नशा करण्यास बसणाऱ्या सहा ते सात जणांनी त्याच्या मानेत मागून येऊन एक इंजेक्शन टोचले. त्यामुळे, यशला थोड्या वेळात चक्कर आणि ताप आला आणि तो जाग्यावरच खाली बसला. यश खाली बसल्यावर स्थानिकांनी त्याच्या घरच्यांना हे कळविले आणि कुटुंबाने त्याला जवळील पालिकेच्या मुक्ताबाई रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. सध्या या प्रकरणात पोलीस मुलाचा जबाब नोंदवित असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, या घटनेने घाटकोपरमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मुंबई विमानतळावर 11.7 किलो गांजा जप्त
मुंबई विमानतळावर 11.774 किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त करुन पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम्सच्या एअर इंटेलिजन्स युनिटने ही मोठी कारवाई केली. आंतरराष्ट्रीय बाजारात या गांजाची किंमत सुमारे 4.12 कोटी रुपये असल्याचा दावा केला जात आहे. याप्रकरणी, मोहम्मद सुहेल (वय 35) या प्रवाशाला अटक करण्यात आली असून आरोपी मूळचा कर्नाटकातील कारवार येथील रहिवासी आहे. 3 ऑक्टोबर रोजी रात्री ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्यांनी विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे प्रवाशाला तपासणीसाठी रोखले. बँकॉकहून बटिक एअरच्या OD 215 विमानाने हा आरोपी मुंबईत आला होता. आरोपीच्या वैयक्तिक झडतीत कोणतेही अमली पदार्थ आढळले नाहीत, मात्र, त्याच्या चेक-इन बॅगेजमधील ROUTE 66 कंपनीच्या ट्रॉली बॅगेची तपासणी केली असता 12 प्लास्टिक पॅकेट्स आढळल्या आहेत. पॅकेट्समध्ये गांजा असल्याचा संशय, फील्ड टेस्टमध्ये हायड्रोपोनिक गांजाची पुष्टी करण्यात आलीय.
दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या गांजाचे एकूण वजन 11,774 ग्रॅम असून आरोपीला 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.30 वाजता NDPS कायद्यांतर्गत अटक झाली. गांजाच्या तस्करीसाठी पैसे मिळत असल्याचेही आरोपीने जबाबात सांगितले. या तस्करीमागील अन्य व्यक्ती आणि नेटवर्कचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.
हेही वाचा























