Mumbai : धमकी देताना एक फिल्मी डॉयलॉग वापरला आणि मुंबई पोलिसांच्या जाळ्यात अडकला, दोन व्यक्तींची हत्या करणाऱ्या सावकाराला बेड्या
Mumbai Crime : भरमसाठ व्याजाने दिलेले पैसे चुकवले नाहीत म्हणून अनधिकृत सावकारी करणाऱ्या व्यक्तीने दोघांची हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.
मुंबई: प्रचंड जास्त व्याजाने दिलेले पैसे चुकवले नाहीत म्हणून दोन जणांची हत्या केल्याची घटना मुंबईच्या गोवंडी विभागात घडली. त्यामुळे या भागात एकच खळबळ उडाली आहे. अनधिकृत सावकारी करणाऱ्या एका व्यक्तीने आणि त्याच्या सहकाऱ्याने ही हत्या केल्याचं उघड झालं आहे. शिवाजी नगर पोलिसांनी (Mumbai Shivaji Nagar Police) अतिशय कौशल्याने दुसऱ्या हत्येच्या गुन्ह्याचा शोध लावला आहे.
कुर्ला येथे आमान शेख या रिक्षा चालकाचा मृतदेह आढळला होता. त्याच्या हत्येचा तपास करत असताना शिवाजी नगर पोलिसांनी नफीस उर्फ कक्की शराफत खान, मुकेश शयमनारायण पाल, मोहम्मद साकीर सेद उर्फ जस्टिन यांना अटक केली होती. यातील नफीस उर्फ कक्की खान हा मुख्य सूत्रधार आहे.
'तेरा भी पापा कर डालुंगा'
या हत्येच्या गुन्ह्यात तपास करीत असताना शिवाजी नगर पोलिसांना आरोपी नफीस उर्फ कक्की खानने यातील मयत व्यक्तीला 'तेरा भी पापा कर डालुंगा' अशी धमकी दिल्याचे समजले. यावेळी त्याने उच्चारलेल्या पापा या व्यक्तीसोबत आरोपीन नेमकं काय केले याचा शोध पोलिसांनी सुरू केला. त्यानंतर गोवंडी येथील कबीर उर्फ पापा करीमुल्ला इद्रिसी व्यक्ती हा हरवलेला असल्याचे समजले.
हा पापा नफीस उर्फ कक्की याच्याकडे रिक्षा चालक म्हणून काम करीत होता. यामुळे पोलिसांनी त्याच्या कुटुंबाकडे चौकशी केली तेव्हा पापा याने कक्की याच्याकडून 70 हजार रुपये व्याजाने घेतले होते. या बदल्यात त्याने दररोज दीड हजार रुपये कक्कीला द्यायचे आणि तोपर्यंत कक्कीकडे असलेल्या आठ रिक्षांपैकी एक रिक्षा चालवायचे काम करायचे असे ठरले.
गेली पाच महिने पापाने दररोज दीड हजार रुपये दिले. मात्र एक दिवस त्याला कक्की ने बेदम मारहाण केली. यात त्याला इम्रान अहमद उर्फ इमो शब्बीर अहमद खान आणि अतिक अरिफ मेमन यांनीही मदत केली. ही मारहाण आणि छळ केल्यावर त्यांनी पापाची हत्या केली आणि त्याचा मृतदेह नवी मुंबईतील एका खाडी भागात फेकून दिला. या दोन्ही हत्येतील व्यक्तींनी कक्कीकडून पैसे उधार घेतले होते आणि दोघेही त्याच्याकडे रिक्षा चालवायचे. भरमसाठ व्याजाने दिलेले पैसे त्यांना परत न करता आल्याने कक्कीने त्यांची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
ही बातमी वाचा: