Crime News : पतीची हत्या करून मृतदेह बेडमधे लपवला, फरार पत्नीचा पोलिसांकडून शोध सुरू
Mumbai Crime News : मुंबईतील साकीनाका परिसरात सोमवारी सकाळी नसीम खान या तरूणाचा बंद खोलीत मृतदेह आढळून आला. खोलीतून दुर्गंधी येत असल्यामळे शेजाऱ्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.
मुंबई : साकीनाका परिसरात पत्नीने पतीची हत्या केली आहे. हत्या करून मृतदेह बेडमधे लपवणाऱ्या पत्नीविरोधात मुंबई पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून संशयित पत्नी फरार आहे. पोलीस तिचा शोध घेत आहेत. नसीम खान ( वय 23 ) असे हत्या झालेल्या पतीचे नाव आहे. तर रुबिना खान असे संशयित पत्नीचे नाव आहे.
साकीनाका परिसरात सोमवारी सकाळी नसीम याचा बंद खोलीत मृतदेह आढळून आला. खोलीतून दुर्गंधी येत असल्यामळे शेजाऱ्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी नसीम याचा मृतदेह बेडमध्ये गुंढाळून ठेवल्याचे आढळे. साकीनाका पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला. संशयित पत्नी फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.
मृत नसीम खान याचे 2017 मध्ये रुबिनासोबत लग्न झाले होते. पूर्वी ते पवईच्या आयआयटी चर्चमध्ये राहत होते. नसीम हा टेलरिंगचे काम करत होता. पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणे होत होती. कुटुंबातील सदस्यांनी दोघांमधील वाद सोडवण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला. परंतु, त्यांच्यातील वाद थांबला नाही. दोघेही 12 जुलै रोजी यादव नगर येथील सरवर चाळ येथे राहण्यासाठी आले होते, अशी माहिती शेजाऱ्यांकडून मिळाली.
14 जुलै रोजी नसीम याच्या वडिलांनी त्याच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रयत्न केला. परंतु नसीमच्या पत्नीने सांगितले की नसीमची तब्येत बरी नाही आणि तो झोपला होता. 15 जुलै पासून नसीमचा मोबाईल बंद होता. त्यामुळे त्याचे वडील चौकशीसाठी आले असता खोलीचा दरवाजा बंद असल्याने ते परत गेले.
खोलीतून दुर्गंधी लागल्यामुळे शेजाऱ्यांनी खोली उघडली. यावेळी नसीमचा मृतदेह बेडमध्ये आढळून आला. शेजाऱ्यांची चौकशी केली असता त्याची पत्नी रुबिना बेपत्ता होती. शिवाय तिचे दोन्ही मोबाईल बंद आहेत. दरम्यान, नसीम याची रूबीनाने हत्या केल्याचा आरोप नसीम याच्या वडिलांनी केला आहे.
शवविच्छेदनासाठी मृतदेह रूग्णालयात पाठवण्यात आला असून पोलीस रुबिनाचा शोध घेत आहेत. साकीनाका पोलीस ठाण्यात 302 आणि 201 अन्वये रूबीनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.