चार्ल्स शोभराज बनण्याचं स्वप्न भंगले... गुन्ह्यांच्या अर्धशतकाजवळ पोहोचलेल्या गुन्हेगाराला विलेपार्ले पोलिसांकडून अटक
चार्ल्स शोभराज स्टाईलने चोऱ्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला विलेपार्ले पोलिसांनी अटक केली आहे. या चोरावर आतापर्यंत 43 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मुंबई : विलेपार्ले परिसरात गेल्या वर्षभरामध्ये चोऱ्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. लोकांच्या खिडकीचे ग्रील कापून घरात शिरायचा पैसे आणि महागड्या वस्तू घेऊन लंपास व्हायचा. या आरोपीचे स्वप्न 'चार्ल्स शोभराज' बनायचं होतं. मात्र मुंबई पोलिसांनी त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ दिलं नाही. अटक करण्यात आलेल्या या लोकल चार्ल्स शोभराजचं नाव आतिष साखरकर असून त्याचं वय 31 आहे. याच्यावर आत्तापर्यंत 43 गुन्हे दाखल आहेत.
अतिषवर वर्ष 2019 ते 2020 मध्ये विलेपार्ले मध्ये एकूण 5 चोऱ्यांचा आरोप आहे आणि हा आकडा जसाजसा तपास पुढे जाईल तसातसा वाढण्याची शक्यता आहे. नेहमी होत असलेल्या या चोऱ्यांमुळे विलेपार्ले येथील नागरिक त्रस्त होते, पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद होत होती, मात्र सीसीटीव्हीमध्ये सुद्धा आरोपी काही स्पष्ट दिसत नव्हता. तर आपली ओळख लपवण्यासाठी अतिष साखरकर नेहमी चार्ल्स शोभराज सारखी टोपी घालून चोऱ्या करायचा. जेणेकरुन तो पटकन ओळखला जात नव्हता. मात्र पोलिसांनी ही त्यांचे प्रयत्न सोडले नाहीत. तर तांत्रिक भावनिक सहायता घेऊन या चोराचा शोध मुंबई पोलिसांनी सुरु केला.
अतिष साखरकरच्या चोरीच्या पद्धतीप्रमाणे चोरी करणाऱ्या आरोपींची यादी तयार करण्याचे काम पोलिसांनी सुरु केलं आहे. अशाच प्रकारच्या झालेल्या काही चोर्या मुंबई, ठाणे, नवी मुंबई, ठाणे ग्रामीण आणि पालघर येथे गुन्हेगारांची यादी तयार करून ती पडताळून या गुन्ह्यांमधील पाहिजे त्या आरोपी बाबत माहिती प्राप्त केली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर डोईजड आणि पोलीस नाईक पडवळ यांनी निरंतर निरीक्षण करून आरोपीचा शोध सुरु केला. सीसीटीवीमध्ये अस्पष्ट दिसत असलेल्या चित्राच्या आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीचे चित्र तयार करून त्यांचा शोध सुरु केला. शोध सुरु केल्यानंतर आरोपीवर वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये घरफोडी बलात्कार यांसारखे 43 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे गुन्ह्याच्या अर्धशतकाकडे वाटचाल असलेल्या आतिषचा प्रवास तुरुंगात येऊन थांबला. पोलिसांना आतिष हा सावेवाडी नायगाव जिल्हा ठाणे येथे असल्याची माहिती मिळाली. विलेपार्ले पोलिसांनी आपलं पथक तयार केलं आणि आरोपीला पकडण्यासाठी सज्ज झाले.
13 ऑक्टोबरला पोलीस त्याच्या घरी धडकले मात्र पोलिसांना पाहताच मोटरसायकलवरून आतिष पळू लागला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला आणि झडप मारून त्याला पकडले. तपासामध्ये आपल्या केलेल्या गुन्ह्यांची कबुली आतिष साखरकरने दिली.
सदरची कामगिरी झोन 8 चे पोलीस उपायुक्त मंजुनाथ शिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विलेपार्ले पोलीस स्टेशन च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अलका मांडवे यांच्या नेतृत्वाखालीपोलीस निरीक्षक राजेंद्र काणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर डोईजड यांच्या प्रयत्नाने पोलीस नाईक राजेश पडवळ, संदीप महाडेश्वर पोलीस शिपाई सचिन राठोड,संतोष कांबळे, आनंदा दिवानजी, दीपक महाजन पोलीस हवालदार उमेश गावडे, नारायण दळवी आणि पोलीस नाईक नेताजी कांबळे आणि सुनील जंगम या पथकाद्वारे शोभराजला अटक करण्यात आली.