Mumbai Crime : लुडो गेममध्ये तरुणाने 60 लाख रुपये गमावले; आरोपींनी बंदुकीच्या धाकावर तरुणाला लुटलं
Mumbai Crime : लुडो खेळताना तरुणाने 60 लाख रुपये गमावले आणि या पैशांची वसुली करणाऱ्यांनी बंदुकीच्या धाकावर तरुणाला लुटलं. मुंबईत हा धक्कादायक प्रकार घडला.
![Mumbai Crime : लुडो गेममध्ये तरुणाने 60 लाख रुपये गमावले; आरोपींनी बंदुकीच्या धाकावर तरुणाला लुटलं Mumbai Crime news a man lost 60 lakh rupees in the Ludo game robbed him at gunpoint Mumbai Crime : लुडो गेममध्ये तरुणाने 60 लाख रुपये गमावले; आरोपींनी बंदुकीच्या धाकावर तरुणाला लुटलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/05/2b02dd8422350e9925c03b354cf3cc6f_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mumbai Crime : कोरोना महामारीमुळे (Covid 19 Pandemic) लागलेल्या देशव्यापी लॉकडाऊन (Lockdown) अनेकांना घरी बसून टाईमपास म्हणून विविध गेम खेळण्याची सवय लागली. त्यातच मोबाईल फोनवर लुडो (Ludo) हा ऑनलाईन गेम सर्रास खेळला जाऊ लागला. परंतु हा गेम एका तरुणाला फारच महागात पडला. लुडो खेळताना तरुणाने 60 लाख रुपये गमावले आणि या पैशांची वसुली करणाऱ्यांनी बंदुकीच्या (Pistol) धाकावर तरुणाला लुटलं. मुंबईत (Mumbai) हा धक्कादायक प्रकार घडला.
मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या तरुणाला काही जणांनी लुडो खेळात हरवलं आणि त्याने 60 लाख रुपये गमावल्याचं सागितलं. क्लॉडिएस मुदालियार असं या तरुणाचं नाव आहे. हा तरुण मर्चंट नेव्हीमध्ये काम करतो. आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराची तक्रार त्याने मुंबईतील धारावी पोलिसात नोंदवली आहे.
काय आहे प्रकरण?
क्लॉडिएस मुदालियारच्या मुशारफ खान नावाच्या मित्राने त्याच्याकडून पाच हजार रुपये उधार घेतले होते. हे पैसे परत देण्यासाठी मुशारफने त्याला सांताक्रूझला बोलावलं होतं. इथे मुशारफचा मित्र वेलू मुरगन आणि इतर लोकांना क्लॉडिएसला भेटला. इथे या लोकांनी क्लॉडिएसला दारु पाजली. मद्यधुंद अवस्थेत असताना त्याला लुडो खेळण्यास सांगितलं. तू या खेळात 60 लाख रुपये हरल्याचं या लोकांनी क्लॉडिएसला सांगितलं. यानंतर मुशारफ आणि त्याच्या मित्रांनी क्लॉडिएसला 60 लाख रुपये देण्यास सांगितलं. पण त्याने नकार दिल्यानंतर या लोकांनी क्लॉडिएसच्या अंगावर जेवढे सोन्या-चांदीचे दागिने होते ते बंदुकीच्या धाकावर लुटले.
मारहाण करुन दागिने लुटले, रोख रक्कम आणण्यास सांगितलं
इतकंच नाही तर आरोपींनी क्लॉडिएसला आपल्या क्लबमध्ये बंद करुन मारहाण केली. शिवाय तुझ्याकडून मिळालेले सोन्या-चांदीच्या दागिन्यांची किंमत 60 लाख रुपये नाही. त्यामुळे घरातून आणखी सोनं आणि रोख रक्कम आणण्यास सांगितलं.
प्रकरण वाकोला पोलिसांकडे वर्ग
तक्रारदार क्लॉडिएसच्या माहितीनुसार, ही घटना 3 ऑक्टोबरची आहे आणि आरोपींच्या धमकीनंतर तो घाबरला. त्याने धारावी पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल केली. त्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सांगितलं की, "आम्ही आरोपींविरोधात IPC च्या कलम 341, 364(A), 392, 506(2), आणि 34 तसंच आर्म्स अॅक्टच्या कलम 3 आणि 25 अंतर्गत गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे."
अधिकाऱ्याने पुढे सांगितलं की, "ही घटना सांताक्रूझमध्ये घडली आणि जिथे घडली ते ठिकाण वाकोला पोलिसांच्या क्षेत्रात येतात आणि त्यामुळे हे प्रकरण वाकोला पोलिसांकडे वर्ग करण्यात आलं आहे."
संबंधित बातमी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)