Mumbai Crime : धार्मिक रितीरिवाज पाळत नाही, घटस्फोट मागते; आंतरधर्मीय लग्न केलेल्या पतीकडून पत्नीचा खून
Mumbai Crime : मुस्लीम रितीरिवाज पाळत नाही, घटस्फोट मागते आणि मुलाचा ताबा देत नाही या रागातून आंतरधर्मीय लग्न केलेल्या पतीने पत्नीची भर रस्त्यात गळा चिरुन हत्या केली.
Mumbai Crime : मुस्लीम रितीरिवाज पाळत नाही, घटस्फोट मागते आणि मुलाचा ताबा देत नाही या रागातून आंतरधर्मीय लग्न (Interfaith Marriage) केलेल्या पतीने पत्नीची भर रस्त्यात गळा चिरुन हत्या केली. मुंबईतील (Mumbai) चेंबूर परिसरात सोमवारी (26 सप्टेंबर) रात्री ही धक्कादायक घटना घडली. इक्बाल महमंद शेख असं आरोपीचं नावं आहे. टिळकनगर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
रितीरिवाज पाळता नसल्यामुळे भांडण
आरोपी इक्बाल महमंद शेख आणि रुपाली रमेश चंदनशिवे यांचा तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. लग्नाच्या काही दिवसातच ती इक्बालच्या घरी राहायला आली. परंतु आंतरधर्मीय विवाह असल्याने रुपालीला लग्नानंतर मुस्लीम परंपरा पाळायला जमत नव्हत्या. इक्बालच्या कुटुंबियांकडून तिच्यावर परंपरा पाळण्यासाठी, बुरखा परिधान करण्यासाठी दबाव टाकला जात होता. मात्र रुपाली त्यांचं ऐकत नसेल आणि यावरुन तिचं इक्बालसह कुटुंबियांसोबत दररोज भांडण होऊ लागलं. मधल्या काळात तिला मुलगा देखील झाला. परंतु इक्बाल आणि कुटुंबियांच्या दबावाला आणि भांडणाला कंटाळून रुपाली सहा महिन्यांपूर्वी वेगळी राहू लागली. असं असलं तरी पती-पत्नीमध्ये फोनवरुन बातचीत होत असले पण मुस्लीम रिती पाळण्यावरुन दोघांमध्ये कायम वाद होत असत.
पतीने पत्नीला भेटायला बोलावलं आणि चाकूने वार करुन पळ काढला
मात्र इक्बाल महमंद शेखने काल संध्याकाळी रुपालीला चेंबूरच्या पीएल लोखंडे मार्गावरील नागेवाडी इथे भेटण्यासाठी बोलावले होते. यावेळी रुपालीने इक्बालकडे तलाक देण्याची मागणी केली. परंतु मुलाचा दाखला देत इक्बालने तलाक देणार नसल्याचं म्हटलं. यानंतर त्यांच्यात वादावादी झाली. यानंतर इक्बाल तिला जवळच्या गल्लीत घेऊन गेला आणि भर रस्त्यात तिच्यावर चाकूने सपासप वार करुन तिथून पळ काढला. या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या रुपालीने जागीच प्राण सोडले. या घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली असता टिळकनगर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मयत रुपालीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला. तर काही वेळातच टिळकनगर पोलिसांनी आरोपी इकबालला बेड्या ठोकल्या आहेत. रुपाली आणि इक्बाल यांना दोन वर्षांचा मुलगा आहे.
मृत रुपाली ही आरोपीची दुसरी पत्नी
दरम्यान रुपाली ही इक्बालची दुसरी पत्नी होती. याआधी त्याचा विवाह झाला होता. मात्र पहिल्या पत्नीकडून मूल होत नसल्यामुळे इक्बालने तिला तलाक दिला होता. यानंतर इक्बालने रुपाली चंदनशिवे हिच्याशी प्रेमविवाह केला होता. लग्न झाल्यावर तिच्यावर मुस्लीम परंपरा पाळण्यासाठी दबाव वाढू लागला. टिळकनगर पोलिसांनी आरोपी इक्बालवर हत्येचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. तर मृत रुपालीच्या कुटुंबियांनी तिच्यावर मुस्लीम रितीरिवाज पाळण्यासाठी दबाव टाकल्याच्या आरोपांचाही पोलीस तपास करत आहेत.