Mumbai Crime : अडीच कोटी रुपयांच्या व्हेल माशाच्या उलटीसह तरुण अटकेत
25 वर्षीय तरुणाला व्हेल माशाच्या उलटीसह अटक केली आहे. व्हेल माशाच्या उलटीचं वजन 2.8 किलो असून त्याची किंमत सुमारे अडीच कोटी रुपये आहे. मुंबई क्राईम ब्रान्चच्या मालमत्ता विभागाने ही कारवाई केली.
Mumbai Crime : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Mumbai Crime Branch) मालमत्ता विभागाने 25 वर्षीय तरुणाला अडीच कोटी रुपयांच्या व्हेल माशाच्या उलटीसह (Whale Vomit) अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या सूत्रांच्या माहितीनुसार, जप्त केलेल्या व्हेल माशाच्या उलटीचं वजन सुमारे 2.8 किलोग्रॅम आहे, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 2.6 कोटी रुपये आहे. या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपीचं नाव वैभव जनार्दन कालेकर आहे. या प्रकरणी पोलिसांनी कालेकर यांच्याविरुद्ध वन्य प्राणी संरक्षण कायदा 1972 चे कलम 2, 39, 44, 48 (अ), 49 (ब), 57, 51 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपासासाठी हे प्रकरण मरीन ड्राइव्ह पोलिसांकडे सोपवण्यात आले आहे.
व्हेल माशाची उलटी अतिशय मौल्यवान
व्हेल माशाची उलटी केवळ बाजारात विकली जात नाही तर ती कोणत्याही हिऱ्यापेक्षाही अधिक मौल्यवान आहे. व्हेल मासा हा पृथ्वीवरील असा जीव आहे, ज्याच्या उलटीला तरंगणारे सोने म्हणतात. व्हेल माशाच्या उलटी अॅम्बरग्रीस (Ambergris) या नावानेही ओळखली जाते. तज्ञांच्या मते, त्याला विष्ठा म्हणतात. म्हणजेच व्हेलच्या शरीरातून बाहेर पडणारा टाकाऊ पदार्थ. वास्तविक ते व्हेलच्या आतड्यातून बाहेर पडते. व्हेल मासे समुद्रातील अनेक गोष्टी खातात. यामुळे, जेव्हा त्यांना त्या गोष्टी पचवता येत नाहीत तेव्हा ती बाहेर टाकते. अॅम्बरग्रीस हे राखाडी किंवा काळ्या रंगाचे घन असते. एकप्रकारे तो मेणापासून बनलेला दगडासारखा पदार्थ आहे.
व्हेलची उलटी महाग का?
अॅम्बरग्रीस हा सुगंधी पदार्थ असतो. तो फार दुर्मिळ असतो, सहज सापडत नाही. याचा वापर नैसर्गिक परफ्युम बनवण्यात केला जातो, हे परफ्युम किंवा अत्तरे फार महागडी असतात. व्हेल माशाची उलटी किंवा अंबरग्रीस जमवणे आणि विकणे हे बेकायदेशीर आहे. तो गुन्हा आहे आणि त्यासाठी शिक्षा सुद्धा होऊ शकते. लोक जर या पदार्थाच्या मागे लागले तर व्हेल माशांना त्रास देऊन पकडतील, पर्यायाने व्हेलची संख्या कमी होईल.
संबंधित बातम्या