व्हिडीओ कॉलवर अल्पवयीन मुलीला इमोशनल ब्लॅकमेल करत अश्लिल फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी देत उकळले पैसे
मुंबई येथील अल्पवयीन मुलीला व्हिडीओ कॉलवर इमोशनल ब्लॅकमेल करत अश्लिल फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी देत पैसे उकळल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी उस्मानाबाद येथून आरोपीला अटक.

मुंबई : मुंबई कुरार पोलिसांनी अशा एका आरोपीला उस्मानाबाद येथून अटक केली आहे, ज्याने एका व्हॉट्सअॅप ग्रुपशी जोडलेल्या अल्पवयीन मुलीच्या प्रेमात असल्याचे भासवून, तिला व्हिडिओ कॉलद्वारे चाकू दाखवून कपडे काढायला लावले. मुलीने भीतीने तिचे कपडे काढल्यानंतर याचा स्क्रीन शॉट मारून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली आणि 58 हजार रुपयांची मागणी केली.
कुरार पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारा 10 वीची अल्पवयीन विद्यार्थीनी, जी एका व्हॉट्सअॅप ग्रुपची सदस्य आहे. संजय लाला ओव्हाळ (वय 29) देखील त्याच ग्रुपमधील सदस्य आहे. संजय हा उस्मानाबादचा रहिवासी आहे. तो एका खाजगी कंपनीत काम करतो. संजय आणि अल्पवयीन मुलगी या ग्रुपच्या माध्यमातून मित्र होते. मे 2019 दरम्यान संजय आणि मुलीने एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. एक दिवस संजयने व्हॉट्सअॅपवर मुलीला व्हिडिओ कॉल केला आणि तिला कपडे काढून गप्पा मारण्यास सांगितले. मुलीने तसे करण्यास नकार दिला. मग दुसऱ्या दिवशी संजयने हातात चाकू घेतला आणि मुलीला सांगितले की जर कपडे उतरले नाहीत तर मी स्वतःला मारून घेईन. भीतीमुळे मुलीने संजयने सांगितल्याप्रमाणे केले. यावर आरोपीने याचा स्क्रीन शॉट घेतला. मुलीच्या अश्लील फोटोंचा व्हिडिओ बनवला आणि तो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडून पैशांची मागणी करू लागला.
आईचे दागिने विकून पैसे पाठवले
वारंवार फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन संजयने पैसे मागण्यास सुरुवात केली. मुलीने घरात ठेवलेले आईचे दागिने हळूहळू विकून मुलाची इच्छा पूर्ण केली. मुलीने तीनवेळा संजयला सुमारे 58 हजार दिले होते. घरात ठेवलेले दागिने गायब झाल्याने आईने मुलीला या संदर्भात विचारले, तेव्हा मुलीने सर्वकाही आईला सांगितले. वरील माहितीनंतर तिच्या आईने कुरार पोलीस ठाण्यात तक्रार दिली. कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश बेळे यांच्या मार्गदर्शनाखाली, पीआय पन्हाळे आणि पीएसआय जाधव यांनी आईच्या तक्रारीच्या आधारे संजयविरोधात पोक्सो कायद्यान्वये खंडणी, विनयभंग आणि जीवे मारण्याच्या धमकीसह गुन्हा दाखल केला. त्यानंतर उस्मानाबाद येथून 2 ऑगस्ट रोजी आरोपीला अटक केली आहे.























