Akola: आईचे क्रूर कृत्य, पोटच्या मुलीला मध्य प्रदेशात 80 हजारांना विकले
Akola Crime News: अकोल्यात चक्क आईनंच आपल्याला मुलीला विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 'आई'च्या नात्याला कलंक लावणारी ही घटना शहरातील कैलासटेकडी भागात घडली आहे.
Akola Crime News: अकोल्यात चक्क आईनंच आपल्याला मुलीला विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 'आई'च्या नात्याला कलंक लावणारी ही घटना शहरातील कैलासटेकडी भागात घडली आहे. पैशांच्या लोभापायी आईनं आपल्या मुलीला केवळ 80 हजार रुपयात मध्यप्रदेशातील एका व्यक्तीला विकण्यात आलं होतं. याप्रकरणी खदान पोलीसांनी चार लोकांवर गुन्हे दाखल केले असून तिघांना ताब्यात घेतले आहे.
नेमकं काय घडलं?
अकोला शहरातील कैलास टेकडी परिसरातील 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार खदान पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आली होती. या तक्रारीनुसार पोलिसांनी मुलीचा शोध घेण्यास सुरुवात झाली. तपास पथके गठित झाली होती. तांत्रिक सहकार्य व सूत्रांच्या माहितीनुसार मुलीची माहिती हाती लागली. राजस्थान मध्यप्रदेश सीमेजवळील जलारा गावात ही बेपत्ता मुलगी असल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यानंतर खदान पोलिसांनी लागलीस घटनास्थळ गाठून अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. यानंतर पोलिसांना त्या मुलीनं सांगितलेल्या आपबितीनं पोलीस पार चक्रावून गेलेत. तिच्या आईनेच 'या' अल्पवयीन मुलीला विकलं असल्याचं धक्कादायक सत्य चौकशीतून समोर आलं. या प्रकरणी अकोला शहरातील खदान पोलिसांनी तिच्या जन्मदात्या आईसह चौघांविरुद्ध विविध कलमान्वये 363, 366, 377, 34 नुसार गुन्हे दाखल केले आहेत. यातील आईसह तिघांना अटक करण्यात आली आहे, तर एक जण फरार आहे.
80 हजार रुपयांत विकलं 40 वर्षीय व्यक्तीला.
आईनेच स्वतःच्या मुलीला लग्नासाठी केवळ 80 हजार रुपयात विकलं असल्याचं पोलिस तपासातून समोर आले. 'या' अल्पवयीन मुलीच्या 'आई'ने सुरुवातीला आपल्या मुलीला कैलास रामचंद्र घोपे (वय 28, राहणार मांजरी, ता. बाळापूर, जि. अकोला.) याच्या ताब्यात दिले होते. त्यानंतर देवीबाई कैलास सावळे (राहणार, अकोट फैल, जि. अकोला.) हिच्या मदतीने मुलीला मध्यप्रदेशात पोहोचविण्यात आलं. तिथे मानसिंह अर्जुनसिंह चव्हाण (वय 40, राहणार जलारा, मध्यप्रदेश.) याच्याकडून लग्नासाठी 80 हजार रुपये घेतले अन् मुलीला त्याच्या ताब्यात देण्यात आलं.
मुलीवर अत्याचार झाल्याची शक्यता!
दरम्यान, मध्यप्रदेशमध्ये मुलीला विकलं गेलं. 'त्या' ठिकाणी तिला पंधरा दिवस आरोपी चव्हाण याच्याकडे ठेवण्यात आलं होतं. या दरम्यान तिला अनेक गोष्टी, अत्याचार सहन करावे लागल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिचे लग्न लावून देण्यात येणार असल्याचं पोलीस तपासात समोर आलं. आता तिच्यासोबत काही अघटीत भयानक घडलं तर नाही ना? याचा तपास खदान पोलीस करीत आहेत.