(Source: ECI/ABP News/ABP Majha)
15 दिवसांच्या बाळाला रस्त्यावर सोडून आई-मामा पसार, 100 CCTV कॅमेऱ्याचे फुटेज तपासून आरोपी अटकेत
मुंबईतील मरिन ड्राईव्ह चौपटीवर बस स्टॉपच्या आडोशाला 15 दिवसांच्या मुलाला सोडून दिल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी 100 सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज स्कॅन केले आणि त्यांना अटक केली.
मुंबई : मुंबईतील मरिन ड्राईव्ह चौपटीवर बस स्टॉपच्या आडोशाला 15 दिवसांच्या मुलाला सोडून दिल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींमध्ये बाळाची आई आणि मामाचा समावेश आहे. मरिन ड्राईव्ह पोलिसांनी ही कारवाई केली. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजच्या मदतीने पोलीस आरोपींपर्यंत पोहोचले. पोलिसांच्या पथकाने आरोपींचा शोध घेण्यासाठी चर्चगेट ते खडवली रेल्वे स्टेशनपर्यंतचे 100 सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज स्कॅन केले आणि त्यांना अटक केली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरोज सत्यनारायण सहारण (वय 22 वर्ष, गृहिणी) आणि तिचा भाव रामसेवक प्रेमलाल यादव (वय 28 वर्ष, राहणार खडवली, जिल्हा ठाणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहे.
सरोजच विवाह राजस्थानमधील एका व्यक्तीशी झाला होता, जो तिच्या वयाच्या दुप्पट आहे. रक्षाबंधनादरम्यान सरोजच भाऊ राम तिला भेटायला राजस्थानला गेला होता. आपल्याला इथे राहायचं नाही, इथून जाऊया असा हट्ट सरोजने धरला. ती आपल्या भावासोबत मुंबईला परत आली आणि परत न जाण्याचा निर्णय घेतला. नंतर ती चार महिन्यांची गरोदर असल्याचे समजलं. तिने गर्भपात करण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत उशीर झाला होता. बाळाला जन्म दिला, पण पतीला आधीच सोडल्यामुळे तिने बाळाला आपल्याजवळ न ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तिने बाळाला दक्षिण मुंबईत सोडून निघून गेली. श्रीमंत लोक सहसा तिथे येतात आणि ते त्याला त्यांच्याबरोबर घेऊन जातील, असा विचार तिने केला, असं पोलिसांनी सांगितलं.
बाळ कुठे सापडलं?
6 मे रोजी मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चौपाटीवर बस स्टॉपच्या आडोशाला अज्ञाताने साधारण 15 दिवसांचं नवजात बाळ ठेवल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक मनिषा ढेकळे यांनी पोलीस पथकासह जाऊन बालकाला ताब्यात घेतलं. या बाबत मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये कलम 317 अन्वये अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यानंतर बालकाला औषधोपचार करुन बाल कल्याण समितीच्या आशा सदन इथे ठेवण्यात आलं. सध्या बाळ जसलोक रुग्णालयात ठेवलं आहे.
गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल भंडारे आणि गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळाचे सीसीटीवी फुटेज, परिसरातील इमारतींचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करुन संबंधित बालकाला ज्या इसमाने ठेवलं त्याचा शोध सुरु केला. बालकाला तिथे ठेवणाऱ्या महिला आणि पुरुष हे चर्चगेट रेल्वे स्टेशनवरुन आल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलं. तर बालकाला ठेवून गेल्यानंतर ते मरिन लाईन्स रेल्वे स्टेशन इथे गेल्याचे दिसले. त्याप्रमाणे आरोपींचा शोध घेत असताना आरोपी हे चर्चगेटवरुन दादर इथे उतरले. त्यानंतर मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये बसल्याचे दिसून आले.
या तपासादरम्यान गुन्हे प्रकटीकरण पथकाने चर्चगेट रेल्वे स्टेशन तसेच त्यानंतर मरिन लाईन्स, चर्नी रोड, ग्रँड रोड, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी प्रभादेवी, लॉवर परेल, दादर, दादर सेंट्रल, माटुंगा, सायन, कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर, विक्रोळी ,कांजूरमार्ग, भांडुप, नाहूर, मुलुंड, ठाणे, कळवा, दिवा, मुंब्रा, डोंबिवली, ठाकुर्ली, कल्याण, शहाड, अंबिवली, टिटवाळा, खडवली या रेल्वे स्टेशनचे सीसीटीव्ही कॅमेरे पाहून आरोपींना खडवली या रेल्वे स्थानकात शोधून काढलं.
या प्राप्त सीसीटीव्ही फुटेजवरुन खडवली या रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूच्या परिसरात शोध घेऊन, बालकाची आई आणि तिचा भाऊ याला ताब्यात घेतलं.