Mira Road Crime : जुगार खेळताना मुख्यमंत्री शिंदेंच्या पुतण्याला अटक; 'सामना'चं वृत्त, पोलीस म्हणतात...
Mira Road Crime News : जुगार खेळताना मुख्यमंत्री शिंदेंच्या पुतण्याला अटक. सामनातील वृत्तानंतर समाजमाध्यमांमध्ये चर्चा. पोलीस म्हणाले...
Mira Road Crime News : शिवसेनेतील प्रबळ नेते एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी काही आमदारांसह बंड केलं आणि शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला. एकापाठोपाठ एक आमदार, खासदार आणि अगदी नगरसेवकांची शिंदे गटात सामील होण्यासाठी रांग लागली. अशातच शिंदे गटानं आम्हीच खरी शिवसेना, असं म्हणत थेट पक्षावर आणि त्यापाठोपाठ पक्षचिन्हावरही दावा केला. तेव्हापासूनच शिवसेनेचं मुखपत्र सामनातून मुख्यमंत्री शिंदेंसह शिंदे गटात सामील झालेल्यांवरही टीकेची तोफ डागली जात आहे. अशाच एका सामनातील (Saamana) वृत्ताची चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुतण्याला अटक केल्याचं वृत्त सामनातून प्रकाशित करण्यात आलं आहे.
मिरा रोडच्या प्रभाग क्रमांक 13 मधील शिंदे गटातील शाखाप्रमुख महेश शिंदे यांच्यासह 11 जणांना गुन्हे शाखेनं जुगार खेळताना अटक केली आहे. जीसीसी क्लबमध्ये जुगार खेळताना यासर्वांना ताब्यात घेण्यात आलं आहे. महेश शिंदे यांच्यासह 11 जणांवर जुगार प्रतिबंधक नियमानुसार कारवाई करुन, रात्रीच त्यांना जामिनही देण्यात आला आहे. या प्रकरणात सहभागी असलेले महेश शिंदे हे मुख्यमंत्र्यांचे पुतणे असल्याचा दावा सामनातून करण्यात आला आहे. त्यानंतर याप्रकरणाची चर्चा राजकीय वर्तुळातही सुरु झाली. मात्र त्यानंतर पोलिसांनी यासदंर्भात स्पष्टीकरण दिलं. आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नातलग अल्याचा आव आणणाऱ्या महेश शिंदे यांचं मुख्यमंत्र्यांशी कोणताही संबध नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
मीरा रोडच्या जीसीसी क्लब या हॉटेलमधील रुम नंबर 794 मध्ये जुगार खेळत असल्याची माहिती वसई-विरार मिरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयाच्या क्राईम युनिट 1 ला मिळाली. त्यानुसार त्यांनी त्या रुमवर धाड टाकून महेश शिंदेसह एकूण 11 जणांना अटक केली होती. जुगार खेळण्यात येणारा रुम हा महेश शिंदे यांच्या नावावर बुक करण्यात आला होता. मात्र सकाळपासून महेश शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुतणे असल्याची अफवा समाजमाध्यमांवर चर्चिली जात होती. त्याला पोलिसांनी पूर्णविराम देत, महेश शिंदे हे मुख्यमंत्र्यांचे पुतणे नसल्याचा निर्वाळा दिला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :