Yavatmal : दहाची जुनी नोट विक्री करणं पडलं 22 हजारांत; तरुणाची ऑनलाईन फसवणूक, नेमकं काय घडलं?
Yavatmal News : दहा रुपयांच्या जुन्या नोटांची चांगल्या दरात विक्री करून देतो असं म्हणून एका तरुणाची ऑनलाईन तब्बल 22 हजारांनी फसवणूक करण्यात आली आहे.
Yavatmal News : दहा रुपयांच्या जुन्या नोटांची चांगल्या दरात विक्री करून देतो असं म्हणून एका तरुणाची ऑनलाईन तब्बल 22 हजारांनी फसवणूक करण्यात आली. ही घटना यवतमाळच्या (Yavatmal) शारदानगर येथील शिरे ले-आऊट परिसरात उघडकीस आली. आकाश नामदेवराव उईके असं या तरूणाचं नाव असून तो शारदानगर येथे राहतो.
आकाश हा घरी असताना त्याच्या मोबाईलवर हर्ष कुमार यादव नामक एका व्यक्तीचा फोन आला. दरम्यान या सायबर भामट्याने जुन्या नोटा चांगल्या किमतीत ऑनलाईन विक्री करून देतो असे आकाशला सांगितले. त्यानंतर आकाशकडे असलेली दहा रुपयाची जुनी नोट त्याने संबंधिताच्या मोबाईल क्रमांकावर पाठविली. दरम्यान सदर नोट ही सायबर भामट्याने 16 लाख रुपयांत विक्री केल्याचा मेसेज केला. तसेच सदर रक्कम मिळवण्यासाठी ऑनलाईन आयडी तयार करावा लागेल असे म्हणून एक हजार रुपयांची मागणी केली. ती रक्कम आकाशने पाठविली. त्यानंतर टॅक्स चार्जच्या नावाने 6 हजार 590 रूपये आणि जीएसटी चार्ज म्हणून 12 हजार 464 मागितले. आकाशने ती रक्कम देखील पाठविली. दरम्यान सदर व्यक्ती एनओसी चार्ज देखील मागत असल्याने आकाशला संशय आला. त्यामुळे त्याने पैसे परत करण्याची विनंती केली. मात्र, पैसे परत न देण्याचे सांगून या सायबर भामट्याने आकाशची हेटाळणी केली. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच आकाशने अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी तक्रार दिली.
सायबर गुन्ह्यात वाढ...
आजकाल प्रत्येक व्यक्तीजवळ स्मार्टफोन आले असून, मोबाईल क्रमांक बँकबरोबर जोडलेला असतो. त्यामुळे याचाच फायदा घेत सायबर भामटे वेगवेगळ्या युक्त्या लढवत बँकेतील पैशांवर दरोडा टाकत आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षात अशा घटनांमध्ये सतत वाढ होताना पाहायला मिळतेय. सुरुवातील फोनवरून बोलून OTP मागत हे सायबर भामटे खात्यातून पैसे काढून घेत होते. मात्र, आता तुमचं खातं बंद पडलं आहे, आधार कार्ड अपडेट करा, पॅनकार्ड लिंक करा अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या मेसेज करून त्याबरोबर एक लिंक देतात. त्या लिंकवर क्लिक करताच खात्यातील पैसे आपोआप कपात होतात. त्यामुळे कोणत्याही अज्ञात मेसेजमध्ये आलेल्या लिंकवर क्लिक करू नका किंवा तुमचा OTP शेअर करू नका असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
Vasai Crime : बँकांनी सील केलेली घरं स्वस्तात देण्याचं आमिष, कोट्यवधींची फसवणूक करणारी टोळी गजाआड