वर्ध्यात आयपीएलवर सट्टा; सहा जणांना घेतले ताब्यात
स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत साडेतीन हजार रुपये रोख दहा मोबाईल आणि तीन टीव्ही असा तब्बल 26 लाख 33 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वर्धा : सावंगी मेघे येथील आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा लावणाऱ्या एका फॉर्म हाऊसवर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून सह सट्टेबाजांना अटक केली आहे. डी वाय पाटील स्टेडियम, नवी मुंबई येथे सुरू असलेल्या पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन या आयपीएल मॅचवर सट्टा लावण्यात आला होता. टीव्ही स्क्रीनवर लाईव्ह क्रिकेट मॅचवर दोन होल्ड बॉक्समध्ये मोबाईल जोडून असलेल्या वेगवेगळ्या मोबाईलवर ग्राहकांशी संपर्क साधत सट्टा लावला जात असल्याचे आढळून आले. तब्बल 26 लाख 33 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सहा आरोपी पोलिसांच्या ताब्यात
पोलीसांनी छापा टाकलेल्या ठिकाणी आयपीएल मॅच सुरू होती. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीसांनी एकुण सहा जणांना अटक केली आहे. होमेश्वर वसंतराव ठमेकर (50 वर्षे), प्रवेश पुंडलिकराव चिनेवार ( 42 वर्षे) अशोक भगवंत ढोबळे (32 वर्षे), गिरीश नामदेवराव क्षिरसागर (31 वर्षे), दिनेश प्रताप नागदेव (29 वर्षे),अविन प्रदीप गेडाम (30 वर्षे) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपींकडून जप्त केला तब्बल 26 लाखांचा मुद्देमाल
पोलिसांनी घटनास्थळावरून 3500 रुपयांची रोख रक्कम, तीन टीव्ही संच, दहा मोबाईल संच, 36 साधे कीपॅड, तीव रेकॉर्डर, एक वायफाय डोंगल, दोन लॅपटॉप, एक इन्वर्टर, एक बॅटरी, एक हिशोबाची डायरी, चारचाकी वाहन, तीन दुचाकी वाहने आणि इतर साहित्य असा एकूण 26 लाख 33 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी विरुद्ध सावंगी मेघे पोलीस स्टेशन येथे जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. इतर जिल्ह्यातील बुकीशी यांचे तार जुळले असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. 3 एप्रिलला ही कारवाई पोलिसांनी केली आहे.