Crime : मराठवाड्याचा बिहार होतोय? आठवडाभरात दोन धक्कादायक खून
रोज एका पाठोपाठ एक घटनेने मराठवाडा हादरतोय. या घटनां व्यतिरिक्त रोज चोऱ्या, दरोडे,चैन स्नॅचिंग,पेट्रोल पंप लूटण्याच्या घटना घडत आहे. एवढ्या घटना घडत असताना कायद्याचे राज्य आहे की गुन्हेगारांचे असा प्रश्न उपस्थित होतोय.
परभणी : राज्यात मागील काही महिन्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष सुरू आहे. या संघर्षात राज्याचे नुकसान तर होत आहे शिवाय राज्याचा गृह विभाग देखील भरडला जातोय की काय असा प्रश्न निर्माण होतोय. या संघर्षातून सरकारमधील एक गृहमंत्री कोठडीत आहेत. तर त्यांच्या जागी आलेल्या नवीन गृहमंत्र्यांना अद्याप ही या विभागावर नियंत्रण मिळवता आले नाही. त्यामुळे राज्यभरात कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. मराठवाड्यात तर दिवसागणिक घडणाऱ्या घटनांनी मराठवाड्याचा बिहार झाल्यासारखी परिस्थिती आहे.
परभणीत अवैध वाळू उपसा करू नका म्हणणाऱ्या तरुणाचा वाळू माफियांकडून खून, पाथरीतील लाडनांद्रा येथे अवैध धंदे चालवणाऱ्यांकडून पोलिसांना मारहाण पिरकर पीआयसह पाच पोलीस जखमी झाले आहेत. नांदेडमध्ये भर सकाळी बांधकाम व्यावसायिकाची खंडणीसाठी गोळ्या घालून हत्या, उस्मानाबादमधील परंड्यात आरोपी पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर मिरची टाकून जीवघेणा हल्ला, बीडमध्ये युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर कंत्राटदाराने बंदुक लावून जीवे मारण्याची धमकी दिली. बीडच्याच गेवराईत वाळू माफियांकडून पोलिसांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. जालन्याच्या रामनगरमध्ये दोन गटातील वादातून रस्त्यावर 4 तास धुडगूस घातला यातील एका जणाने 8 वेळा गोळीबार केला. रोज एका पाठोपाठ एक घटनेने मराठवाडा हादरतोय. या घटनां व्यतिरिक्त रोज चोऱ्या, दरोडे,चैन स्नॅचिंग,पेट्रोल पंप लूटण्याच्या घटना घडत आहे. एवढ्या घटना घडत असताना कायद्याचे राज्य आहे की गुन्हेगारांचे असा प्रश्न उपस्थित होतोय..
मराठवाड्यातील कुठल्या जिल्ह्यात रोज पोलिसांच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या घटना घडत आहेत. गुन्हेगारांची एवढी मजल वाढलीय की ते थेट पोलिसांवर हल्ला चढवत आहेत. पोलीस देखील चिडीचूप आहेत. गुन्हेगारच जर पोलिसांवर हल्ला करत असतील तर सामान्यांचे काय होणार असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. दुसरीकडे अवैध वाळू माफियाही एवढे मुजोर झालेत की पोलीस, महसूलचे अधिकारी किंवा त्यांना विरोध करणारे गावकरी या सर्वांना ते संपवण्याची भाषा करत आहेत.
राज्यात ईडी, सीबीआयच्या कारवाया सुरु आहेत. ज्यावर कधी सत्ताधारी आंदोलन करत आहेत. सत्ताधाऱ्यांनी काही कारवाई केली विरोधक आंदोलन करत आहेत.यासोबतच एसटी,नगर परिषद, महसूल, विद्यार्थी आदी घटक रोजच रस्त्यावर आहेत. यातूनच पोलिसांवर ही कामाचा ताण वाढल्याने पोलिसांना गुन्हेगारांकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही.