भंगाराच्या ट्रकमध्ये सात किलो युरेनियम अन् दोन आरोपी, एटीएसच्या तपासात युरेनियमच्या मुंबईपर्यंतच्या प्रवासाचा उलगडा
एटीएसच्या अधिकाऱ्यांनी गुजरातमधील व्यापारी असल्याचा बनाव करत आरोपींशी संपर्क साधला आणि दोघांना ताब्यात घेतलं. आरोपींकडून ताब्यात घेण्यात आलेल्या युरेनियमची किंमत जवळपास 25 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे.
मुंबई : महाराष्ट्र एटीएसनं 7 किलो युरेनियमसारख्या घातक पदार्थासोबत दोन तरुणांना अटक केली आहे. एटीएसचे डीआयजी शिवदीप लांडे यांनी सांगितलं की, हे दोन्ही आरोपी युरेनियम विकण्याच्या प्रयत्नात होते आणि त्यासाठी ग्राहक शोधत होते. 7 किलो युरेनियमसह अटक करण्यात आलेल्या या दोन आरोपींची नाव आहेत, जिगर पंड्या आणि अबु ताहिर अफसल हुसैन चौधरी. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिगर पांड्या आणि अबू ताहिर दोघेही कॉलेजमध्ये असल्यापासून एकमेकांना ओळखतात. ताहिर इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचं काम पाहतो. दोन्ही आरोपींनी एमबीएमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
तपासात मिळालेल्या माहितीनुसार, ताहिरच्या वडिलांचा गोवंडी परिसरात भंगाराचा व्यावसाय आहे. 5 ते 6 वर्षांपूर्वी त्यांच्या दुकानात एक ट्रक भरुन भंगार आलं होतं. ज्यामध्ये त्यांना युरेनियम मिळालं होतं. हा पदार्थ वेगळा असल्यामुळे त्यांनी तो सांभाळून आपल्या कपाटात ठेवला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्यांना त्या पदार्थाबाबत काहीच माहिती नव्हती.
अबु ताहिरनं एटीएसला दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी 2021 मध्ये जेव्हा त्याने हा पदार्थ पाहिला, त्यावेळी त्यासंदर्भात माहीत करुन घेण्यासाठी त्याने इंटरनेटवर सर्च करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने यासंदर्भात आपला मित्र जिगरला माहिती दिली होती, जो आयटी कंपनीत कामाला होता. जिगरची ओळख एका प्रायव्हेट लॅबमध्ये होती. दोघांनी त्या लॅबमध्ये संपर्क साधून हा नक्की कोणता धातू आहे, याची माहिती करुन घेण्याचं ठरवलं. लॅबच्या मालकाच्या मदतीनं दोघांनी या धातूबद्दल माहिती करुन घेण्याचं काम सुरु केलं आणि तपासणीनंतर त्यांना समजलं की, हा धातू नाही, हा युरेनियम आहे. एवढंच नाहीतर, याचा मार्केटमध्ये जवळपास 25 कोटी किंमत आहे, हे ऐकून तर दोघांनाही धक्काच बसला. दोघेही मार्केटमध्ये युरेनियम विकण्यासाठी ग्राहकाच्या शोधात होते.
फेब्रुवारी महिन्यात या सर्व प्रकारासंदर्भात एटीएसला माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे एटीएल गेल्या अनेक दिवसांपासून शोध घेण्याच्या प्रयत्नात होती. एटीएसच्या सदस्यांनी गुजरातमधील व्यापारी असल्याचा बनाव करत युरेनियम खरेदी करण्यासाठी दोन्ही आरोपींशी संपर्क साधला. ज्यावेळी एटीएसच्या अधिकाऱ्यांना युरेनियमचं सॅम्पल मिळाला, त्यावेळी त्यांनी त्याची तपासणी सुरु केली. त्यासाठी ते भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये पाठवण्यात आलं. शिवदीप लांडे यांनी सांगितलं की, खरंचे हे युरेनियम आहे का? हा प्रश्न आम्हालाही होता. त्यामुळे प्रकरण पुढे नेण्यापूर्वी आम्हाला हे जाणून घ्यायचं होतं.
जवळपास दोन महिन्यांनी भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटरहून समजलं की, हे युरेनियम आहे, जे हायली रेडियोअॅक्टिव्ह असून यापासून माणसांना धोका आहे. त्यानंतर एटीएसनं यासंदर्भातील माहिती अॅटॉमिक मिनरल्स डायरेक्टर फॉर एक्सप्लोरेशन अँड रिसर्च, अॅटॉमिक एनर्जी विभाग नागपूरला दिली. त्यानंतर त्यांच्या तक्रारीच्या आधारे एटीएसनं गुन्हा नोंदवला आणि दोन आरोपींना अटक केली. त्यानंतर दोन्ही आरोपींना कोर्टाट हजर करण्यात आलं असून दोघांनाही 12 मेपर्यंत एटीएस कस्टडीमध्ये पाठवण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :