लोकलमध्ये तुफान राडा, दोन गटात तुंबळ हाणामारी; एका प्रवाशाचा मृत्यू
Kalyan Local Fight Video : क्षुल्लक वादातून लोकलमध्ये प्रवाशांच्या दोन गटात राडा झाल्याची बातमी समोर आली आहे. मारहाणीत एका जखमी प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
ठाणे : लोकल प्रवासामध्ये अनेक घटना घडतात. अनेकदा लोकल ट्रेनमध्ये हाणामारी झाल्याच्या घटना समोर येतात. आता पुन्हा एक अशीच घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. क्षुल्लक वादातून लोकलमध्ये प्रवाशांच्या दोन गटात राडा झाल्याची बातमी समोर आली आहे. मारहाणीत एका जखमी प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कल्याणमध्ये ही घटना घडली आहे. हा राडा मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे. कल्याण रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली आहे.
लोकलमध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी
चिडवण्याच्या वादातून धावत्या लोकलमध्ये प्रवाशांच्या दोन गटात हाणामारी झाली. या हाणामारीत दोन प्रवासी गंभीर जखमी झाले. रविवारी रात्री अडीच वाजता सुमारास शेवटच्या कसारा लोकलमध्ये ही घटना घडली होती. यापैकी एका प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दत्तात्रय भोईर असं मयत प्रवाशाचं नाव आहे. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी चार जणांपैकी दोन जणांना अटक केली आहे. त्यांची नावे अमोल परदेशी आणि तनुज जुमवाल अशी आहेत. त्यांच्या दोन साथीदारांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
नेमकं काय घडलं?
शहापूर तालुक्यातील चांदीवली परिसरात राहणारे दत्तात्रय भोईर आणि प्रदीप सिरोशे हे दोघे त्यांच्या दोन मित्रांसोबत उल्हासनगरातील एका मित्राच्या हळदी कार्यक्रमात आले होते. हळदीचा कार्यक्रम आटोपून चौघांनी परतण्यासाठी शहाड रेल्वे स्थानकातून शेवटची कसारा लोकल पकडली. चौघे ज्या डब्यातून प्रवास करीत होते. त्या डब्यात आंबिवलीहून अन्य चार प्रवाशांनी लोकल पकडली होती. लोकल सुरु असताना दत्तात्रय भोईर आणि प्रदीप सिरोशेसह अन्य दोन तरुण आपसात चर्चा करीत असताना हास्य विनोद करीत होते. समोरच्या प्रवाशांना दत्तात्रय भोईर आणि त्यांचे मित्र आम्हाला पाहूनच हास्य विनोद करीत आम्हाला चिडवत असल्याचा गैरसमज झाला. या कारणावरुन दोन्ही गटात वाद झाला.
धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला
या वादात एका प्रवासी गटाने दुसऱ्या प्रवासी गटावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात दत्तात्रय भोईर आणि प्रदीप सिरोशे गंभीर जखमी झाले. कल्याण रेल्वे पोलिसांनी हल्ला करणाऱ्या अमोल परदेशी आणि तनुज जुमवाल या दोघांना अटक केली. अन्य दोन साथीदार संधीचा फायदा घेत पसार झाले. जखमी झालेल्या दत्तात्रय भोईर आणि प्रदीप सिरोशे एका खाजगी रुग्णलायात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना दत्तात्रय भोईर यांचा आज गुरुवारी सकाळी दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली असून आणखी दोघांचा शोध सुरु आहे.