कोचिंग सेंटर्स तातडीने बंद करा, टॉपर विद्यार्थीनीची सुसाईड नोट, 10 वर्षांनी प्रकरण पुन्हा चर्तेत!
दहा वर्षांपूर्वी कोटा येथे एका कोचिंग क्लासेसमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीने आत्महत्या केली होती. तिची सुसाईड नोट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.
Kota Student Suicide Case: राजस्थानातील कोटा शहर हे JEE, NEET आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक नगरी म्हणून ओळखली जाते. या शैक्षणिक नगरीत गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांची चर्चा होते. अशातच सुमारे दहा वर्षापूर्वी आत्महत्या केलेल्या एका तरुणीची सुसाईड नोट सध्या सोशल मीडियावर नव्याने चर्चेत आली आहे.
कृतीने 2016 साली आत्महत्या केली
कृती त्रिपाठी असं या तरुणीचं नाव होतं. कृतीने 2016 मध्ये इमारतीहून उडी घेत आत्महत्या केली होती. त्यावेळी तिने लिहिलेली सुसाईड नोट आज नव्याने व्हायरल होत आहे. कृतीने भारत सरकार आणि मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सर्व कोचिंग सेंटर तातडीने बंद करावी अशी मागणी केली होती. इतकंच नाही तर तिने विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा कशी जीवघेणी ठरत आहे, आई वडिलांचा मुलांवर दबाव, सामाजिक तणाव अशा विविध विषयांवर सविस्तर लिहिलं होतं. कृतीला 2016 मध्ये JEE मेन्स परीक्षेत तब्बल 144 गुण मिळाले होते.
90 टक्के गुण मिळवणारी विद्यार्थिनी पण...
कृती स्वत: 90 टक्के गुण मिळवणारी विद्यार्थीनी होती. त्यामुळे आपल्या आत्महत्येने अनेक प्रश्नचिन्ह उभे राहू शकतात याची तिला कल्पना होती. म्हणूनच तिने सुसाईड नोटमध्ये त्याचाही उल्लेख केला होता. शिवाय तिने स्वत:च्या आईनेही आपल्याला हवं ते निवडण्याचं स्वातंत्र्य दिलं नाही, याचाही उल्लेख केला होता.
कृती त्रिपाठीच्या सुसाईड नोटमध्ये नेमकं काय?
कृती त्रिपाठी म्हणते, "मी भारत सरकार आणि मानव संसाधन मंत्रालयाला (HRD) सांगू इच्छिते की, जर तुमची खरोखरच इच्छा असेल की, कोणत्याही विद्यार्थ्याने आत्महत्या करू नये, तर जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर सर्व कोचिंग सेंटर तातडीने बंद करावे. हे कोचिंग क्लासेस विद्यार्थ्यांना आतून रिकामी करतात. वरवरच्या माहितीच्या नादात, त्यांना काहीच मिळत नाही. अभ्यासाचा इतका ताण असतो की मुले या ओझ्याखाली दबून जातात."
मी इतर विद्यार्थ्यांना डिप्रेशनमधून बाहेर काढलं
कृती म्हणते, "मी कोटा इथे अनेक विद्यार्थ्यांना डिप्रेशन आणि मानसिक तणावातून बाहेर काढून आत्महत्या करण्यापासून रोखण्यात यशस्वी झाले. पण मी स्वतःला वाचवू शकले नाही. खूप लोकांना यावर विश्वास बसणार नाही की, माझ्यासारखी मुलगी, जिला 90+ गुण मिळत होते, तीही आत्महत्या करू शकते. पण मी तुम्हाला समजावू शकत नाही की, माझ्या मनात आणि हृदयात किती तिरस्कार भरला आहे."
माझ्या आईसाठी-
"तुम्ही माझ्या लहानपणाचा आणि निरागसतेचा फायदा घेतला. मला विज्ञान आवडावे यासाठी सतत दबाव टाकून भाग पाडले. मी विज्ञान शिकत राहिले, ते फक्त तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी. मला क्वांटम फिजिक्स आणि अॅस्ट्रोफिजिक्स सारखे विषय आवडू लागले आणि त्यातच बीएससी करायचे ठरवले. पण खरं तर मलाआजही इंग्रजी साहित्य आणि इतिहास खूप आवडतो. कारण, त्यांनीच मला माझ्या आयुष्यातील काळोख्या क्षणांतून बाहेर काढले आहे."
धाकट्या बहिणीवर दबाव नको
"हीच जबरदस्ती आणि चतुराईची खेळी तुम्ही माझ्या 11 वीत शिकणाऱ्या धाकट्या बहिणीवर करू नका. तिला जे करायचे आहे तेच करू द्या, तिला जे शिकायचे आहे त्याचाच अभ्यास करू द्या. कारण, ती त्या क्षेत्रातच सर्वोत्तम करू शकेल, ज्या गोष्टीची तिला आवड आहे," अशी विनंतीही या सुसाईड नोटमध्ये केल्याचं दिसतंय.
पालकांच्या इच्छा मुलांवर लादल्या जातात
"आपण या स्पर्धेत आपल्या मुलांचे स्वप्नच हिरावून घेत आहोत, हे पाहून मन विचलित होतंय. आज आपण आपल्या कुटुंबीयांशीच स्पर्धा करू लागलो आहोत. आमक्याचा मुलगा-मुलगी डॉक्टर झाली, मग आपल्या मुलालाही डॉक्टर बनवायला हवं. तमक्याची मुलगी शिकायला कोटा होस्टेलला गेली, मग आपणही तिकडेच पाठवायचं, या ज्या पालकांच्या इच्छा असतात, त्या मुलांवर लादल्या जातात ते खूपच वाईट आहे. मुलांच्या इच्छा-स्वप्नांना विचारात न घेताच आपण त्यांच्यावर आपली स्वप्ने लादत आहोत," असंही या मुलीने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलंय.
#कोटा में आत्महत्या करने वाली छात्रा कृति ने अपने सुसाइड नोट में लिखी थी कि :🥲
— RICHA PATEL ( ऋचा पटेल ) (@obcricha) January 19, 2025
-"मैं भारत सरकार और मानव संसाधन मंत्रालय से कहना चाहती हूंँ कि अगर वो चाहते हैं कि कोई बच्चा न मरे तो जितनी जल्दी हो सके इन कोचिंग संस्थानों को बंद करवा दें,
ये कोचिंग छात्रों को खोखला कर देते हैं।… pic.twitter.com/GlksvyS5tA
कमकुवत मुलं आत्महत्येच्या आहारी जातायत
कृतीने पुढे लिहिलं की, "आज आपल्या शाळा (कोचिंग संस्थान) मुलांना कौटुंबिक नातेसंबंधांचे महत्त्व शिकवू शकत नाहीत, त्यांना अपयश, पराभव किंवा समस्यांना कसं तोंड द्यायचं, त्यांच्याविरोधात कसं लढायचं याचे धडे देऊ शकत नाहीत. त्यांच्या मनात फक्त एकमेकांशी स्पर्धा करण्याची भावना भरली जात आहे, जी विषासारखी त्यांचे आयुष्य संपवत आहे. जे कमकुवत आहेत ते आत्महत्या करत आहेत आणि जे थोडेसे धीट आहेत ते व्यसनाच्या आहारी जात आहेत. जेव्हा आमची मुले अपयशाने खचून जातात, तेव्हा त्यांना हेच माहीत नसते की त्यातून बाहेर कसे पडावे. त्यांचे नाजूक हृदय या अपयशाने तुटून जाते आणि याच कारणामुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे."
हेही वाचा :
Latur Student Kota : लातूरच्या अविष्कार कासलेची कोटामध्ये आत्महत्या
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI