ED Raid : आमिर खानच्या घरातून 17 कोटी रुपये जप्त, 5 बॅगांमध्ये भरल्या होत्या नोटा, वाचा संपूर्ण प्रकरण
Kolkata ED Raid : कोलकाता येथील व्यावसायिक आमिर खान च्या घरातून अंमलबजावणी संचालनालयाने (ED) 17 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे.
Kolkata ED Raid : अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने (ED) कोलकाता येथे मोठी कारवाई केली आहे. कोलकाता येथील व्यावसायिक आमिर खानच्या घरात ईडीला घबाड सापडलं आहे. आमिर खानच्या घरातून अंमलबजावणी संचालनालयाने (ED) 17 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. पाच बॅग्समध्ये ही रोकड ठेवण्यात आली होती. ईडीने व्यावसायिक आमिर खानच्या (Aamir Khan) गार्डन रीच येथील निवासस्थानी छापेमारी करत रोकड जप्त केली. शनिवारी सकाळी ही छापेमारी करण्यात आली. शनिवारी सकाळी सुरु झालेल्या छापेमारी शनिवारी रात्रीपर्यंत सुरु होती. शनिवारी रात्री उशिरापर्यंत पैशांची मोजणी सुरु होती.
कोलकाता येथील व्यावसायिक आमिर खानच्या निवासस्थानी ईडीला 10 बॅग्स सापडल्या. यामधील पाच बॅगांमध्ये 500 आणि 2000 रुपयांच्या नोटा भरलेल्या होत्या. याशिवाय 200 रुपयांच्या नोटाही भरून ठेवण्यात आल्या होत्या. ईडीने आर्थिक गैरव्यवहार कायदा 2002 (PMLA) अंतर्गत ही कारवाई केली आहे. फेडरल बँकेकडून (Federal Bank) मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात याप्रकरणी याचिका दाखल करण्यात आली होती. याअंतर्गत 15 फेब्रुवारी रोजी कोलकाता पार्क स्ट्रिट पोलीस स्टेशनमध्ये (Park Street Police Station) पहिला एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला होता.
ED carried out search operations under the provisions of the PMLA at 6 premises in West Bengal's Kolkata yesterday, in connection with an investigation relating to the Mobile Gaming Application. During the search, various incriminating documents have been recovered & seized: ED pic.twitter.com/Aww4JjHkma
— ANI (@ANI) September 11, 2022
गेम अॅपचा वापर करुन फसवणूक
ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमिर खानने गेमिंग अॅपचा वापर करुन लोकांची फसवणूक केली. आमिर खानने ई-नगेट्स (E-Nuggest) नावाच्या मोबाईल गेमिंग अॅपचा (Mobile Gaming Application) वापर करून युजर्सची फसवणूक केली. आमिरने ई-नगेट्स अॅप लाँच केला. त्यानंतर सुरुवातीला युजर्सला कमिशन देत बक्षिसं (Rewards) दिली. युजर्सच्या वॉलेटमध्ये पैसे पाठवले. त्यानंतर युजर्सचा अॅपवरील विश्वास वाढल्याने युजर्स अॅपमध्ये अधिक पैसे गुंतवू लागले. त्यानंतर आमिरने या अपचा वापर करत युजर्सची फसवणूक केली.
'असे' कमवले कोट्यवधी रुपये
अंमलबजावणी संचालनालयाने याबाबत माहिती देत सांगितलं की, युजर्सनी मोबाइल गेमिंग अॅपमध्ये पैसे गुंतवल्यानंतर मोठी रक्कम गोळा झाली. त्यानंतर, या अॅपद्वारे पैसे परत काढण्यासाठी युजर्सवर बंदी आणण्यात आली. सिस्टम अपग्रेडेशन, कायद्याची अंमलबजावणी करणार्या एजन्सीद्वारे तपासणी या बहाण्याने अॅपमधून पैसे काढणं अचानक बंद करण्यात आलं. यानंतर, युजर्सच्या प्रोफाइलमधील माहितीसह सर्व डेटा अॅप सर्व्हरवरून हटविला गेला. त्यानंतर युजर्संना आमिरची युक्ती समजली आणि आपली फसवणूक झाल्याचं कळालं.
कोट्यवधींची फसवणूक
याआधी शनिवारी केंद्रीय तपास यंत्रणांनी मोबाइल गेमिंग ऍप्लिकेशनशी संबंधित तपासासंदर्भात कोलकाता येथे सहा ठिकाणी शोधमोहीम राबवण्यात आली. ईडीने सांगितले की, तपास मोहिमेदरम्यान या प्रकरणाशी संबंधित संस्था बनावट खाती वापरत असल्याचं आणि युजर्सना फसवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचं समोर आलं.