Kalyan Crime News : आधी खून, मग आत्महत्येचा बनाव; पोस्टमॉर्टम रिपोर्टमुळे फुटलं आईच्या हत्येचं बिंग
Kalyan Crime News : व्यसनासाठी पैसे न दिल्यानं पोटच्या मुलानंच आईचा गळा घोटला. पण सत्य लपवण्यासाठी आत्महत्येचा बनाव रचला.
Kalyan Crime News : कल्याणमध्ये (Kalyan) एका व्यसनाधीन मुलानं आई व्यसन करण्यासाठी पैसे देत नसल्यानं तिची गळा घोटून हत्या केली. त्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आईनं आत्महत्या केल्याचा बनाव रचला. पोलिसांनी (Kalyan Police) मयत महिलेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवल्यामुळे आत्महत्या नसून हत्या झाल्याचा उलगडा झाला. कल्याण पुर्वमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.
व्यसनासाठी आई पैसे देत नसल्यानं मुलानं जन्मदात्या आईची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याण पुर्वमध्ये उघडकीस आली आहे. नशेबाज मुलानं गळा आवळून आईची हत्या केली. ही हत्या नाही तर आत्महत्या आहे, हे दाखविण्यासाठी त्यानं आईचा मृतदेह घरात लटकवून ठेवत दिशाभूल करण्यासाठी आईनं आत्महत्या केल्याचा कांगावा केला. पोस्टमार्टम रिपोर्टमधून या प्रकरणाचा उलगडा झाला. याप्रकरणी कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी आईची हत्या करणारा मुलगा रवी पुमणी याला अटक केली आहे.
कल्याण पूर्व भागातील हनुमान नगर परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. कल्याण पूर्व भागातील कोळसेवाडी पोलिसांना हनुमाननगर परिसरात एका घरांत एका 64 वर्षीय महिलेनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता एक महिला मृत अवस्थेत आढळून आली. तसेच तिचा मुलगा देखील जखमी अवस्थेत होता. सुरुवातीला मुलानं आईनं आपल्याला मारून स्वतः आत्महत्या केल्याचा बनाव रचला. पोलिसांनी घटनेची नोंद करत मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टमसाठी पाठवला.
पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निशा चव्हाण यांनी या आत्महत्येच्या घटनेचा तपास सुरु केला. मृत महिलेचे नाव सरोजा पुमणी होतं. घरात सरोजा आणि त्यांचा 34 वर्षीय मुलगी रवी पुमणी राहत होते. पोस्ट मार्टमनंतर डॉक्टरांनी दिलेला अहवाल पाहून पोलिसही हैराण झाले. ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं अहवालात स्पष्ट करण्यात आलं होतं. पोलिसांनी मुलगा रवी याला ताब्यात घेतलं, त्याची चौकशी केली. नंतर जे वास्तव समोर आलं ते अत्यंत धक्कादायक होतं.
आरोपी मुलगा रवी हा व्यसनाधीन आहे. नशा करण्यासाठी आईकडून वारंवार पैसे मागायचा. त्यासाठी आईसोबत तो भांडण करायचा. सोमवारी रात्री आई मुलात जोरदार भांडण झालं. भांडणात रवीला दुखापत झाली. त्यानंतर संतापलेल्या रवीनं गळा आवळून आईची हत्या केली. ते लपवण्यासाठी रवीनं आईचा मृतदेह घरात लटकवला. आईनं आत्महत्या केल्याचं त्यानं पोलिसांना भासवलं. मात्र कोळसेवाडी पोलिसांच्या सखोल तपासाअंती ही हत्या उघडकीस आली आहे.