Kalyan Crime : चारित्र्याच्या संशयावरुन पतीकडून पत्नीची हत्या, भांडण सोडवण्यासाठी आलेल्या शेजाऱ्यावरही हल्ला
Kalyan Crime : चारित्र्याच्या संशयातून पतीने तिची हत्या केल्याची घटना कल्याण पूर्व परिसरात घडली आहे. पती-पत्नीचे भांडण सुरु असताना मध्यस्थी करण्यास गेलेल्या शेजाऱ्यावर देखील आरोपीने चाकूने हल्ला केला
Kalyan Crime : पत्नीवर असलेल्या संशयातून पतीने तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याण (Kalyan) पूर्व परिसरात घडली आहे. पती-पत्नीचे भांडण सुरु असताना मध्यस्थी करण्यास गेलेल्या शेजाऱ्यावर देखील चाकूने हल्ला करण्यात आला असून तो देखील जखमी झाला आहे. या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात आरोपी सुनील शिंदे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून त्याला ताब्यात घेतलं आहे. तर जखमी झालेले परब याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पत्नीचे प्रेमप्रकरण असल्याच्या संशयातून सुनील शिंदे याने ही हत्या केली असावी असा संशय पोलिसांकडून व्यक्त केला आहे. कोळशेवाडी पोलीस पुढील तपास करत आहेत.
कल्याण पूर्वेकडील तिसगाव पाडा परिसरात सुनील शिंदे आपल्या पत्नीसह राहतात. सुनीलला त्याच्या पत्नीवर असलेल्या संशयातून पती आणि पत्नीमध्ये सातत्याने वाद होत असत. आज सकाळच्या सुमारास दोघांमध्ये भांडण झाले. संतापाच्या भरात पती सुनीलने पत्नीवर चाकूने हल्ला केला. याच दरम्यान त्यांच्या शेजारी राहणाऱ्या परब नावाच्या तरुणाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुनीलने रागाच्या भरात त्याच्यावरही चाकूने हल्ला केला. जखमी झालेल्या परबने याबाबत कोळशेवाडी पोलिसांना माहिती दिली. कोळशेवाडी पोलिसांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत सुनील याला ताब्यात घेतलं.
दरम्यान या हल्ल्यात सुनील याची पत्नी मृत पावली होती. तिचा मृतदेह शविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. कोळशेवाडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
टीव्ही बंद केल्याचा राग, सुनेने सासूच्या हाताचा चावा घेतला, पतीलाही मारहाण
अनेक वेळ क्षुल्लक कारणांवरून मारहाण किंवा हत्येच्या बातम्या आपल्या कानावर पडतात. अशीच काहीशी घटना ठाण्यामध्ये घडली आहे. टीव्ही बंद करण्याच्या रागातून चक्क सूनेने सासूच्या हाताची बोटं चावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ठाण्यातील अंबरनाथ येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. सून टीव्ही बघत असताना सासूने टीव्ही बंद केला, सूनेला याचा राग आला. रागाच्या भरात सूनेने सासूच्या हाताचा चावा घेत, सासूच्या हाताची तीन बोट चावली इतकंच नाही, तर सोडवताना मध्ये आलेल्या पतीलाही मारहाण केली. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या