मोठी बातमी : अल्पवयीन मुलाची कारला धडक, मित्रांसोबत मिळून कारचालकाला बेदम मारहाण करत गाडीची तोडफोड
Kalyan Accident : अल्पवयीन मुलाने चारचाकीला धडक दिल्याची घडना कल्याणमधील आटाळी परिसरात घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाली आहे.

कल्याण : पुण्यातील कल्याणीनगर भागातील पोर्शे कार अपघात (Pune Car Accident) प्रकरण चर्चेत असताना आता कल्याणमध्ये (Kalyan Crime News) तशीच काहीशी पुनरावृत्ती झाल्याची घटना घडली आहे. अल्पवयीन मुलाने कार चालवताना दुसऱ्या चारचाकीला धडक दिल्याची माहिती समोर येत आहे. अल्पवयीन मुलाने चार चाकीला धडक दिल्याची ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाली आहे. इतकंच नाही, तर कारला धडक दिल्यानंतर अल्पवयीन मुलाने मित्रांना बोलावून कारचालकाला बेदम मारहाण केली. याशिवाय, गाडीची तोडफोड देखील केली आहे.
कल्याणमध्ये अल्पवयीन मुलाची चारचाकीला धडक
अल्पवयीन मुलाच्या वडिलांचे नाव राजाराम चौधरी असल्याचं समोर आलं आहे. कल्याण जवळील आटाळी परिसरात ही घटना घडल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. खडकपाडा पोलिसांनी अल्पवयीन मुलासह त्याच्या वडिलांच्या विरोधात केला गुन्हा दाखल केला आहे. कल्याण खडकपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
पुण्यामध्ये पोर्शे कारनंतर आता कल्याणमध्ये ब्रिझा कार
पुण्यामध्ये अल्पवयीन मुलाने अपघात केल्याची घटना ताजी असताना कल्याणमध्ये अल्पवयीन मुलाने अपघात केल्याने पुन्हा कार अपघाताची चर्चा रंगली आहे. कल्याण अटाळी गावात शुक्रवारी मध्यरात्री अल्पवयीन मुलगा ब्रिझा कार घेऊन कल्याणवरून अटाळी येथे असलेल्या आपल्या घरी जात असताना अटाळी चौकात रस्त्याचा अंदाज न आल्याने समोरून येणाऱ्या किया कारला अल्पवयीन मुलाने धडक दिली, या धडकेनंतर वाद निर्माण झाला.
कारचालकाला बेदम मारहाण करत गाडीची तोडफोड
ही धडक देऊनही अल्पवयीन मुलगा थांबला नाही, त्याने फोनव्दारे संपर्क करून काही गुंड बोलवून घेतले आणि किया कारमध्ये असलेल्या वाहन चालकाला बेदम मारहाण केली. धक्कादायक बाब म्हणजे ही घटना मध्यरात्री उशिरा घडली, मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. तक्रारदार नसल्यामुळे गुन्हा दाखल केला नाही, असे सांगण्यात आले. या अपघाताची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरल्यामुळे पोलिसांनी सावध भूमिका घेत अल्पवयीन मुलासह त्याच्या वडिलांवर पोलिसांनी स्वतः गुन्हा (सुओ मोटो) दाखल करून तपास सुरू केला आहे.
अल्पवयीन मुलाचे वडील भाजपचे पदाधिकारी
या अल्पवयीन मुलाचे वडील राजाराम चौधरी हे भाजपचे पदाधिकारी असल्याचे समोर आले आहे. राजाराम चौधरी यांनी पोलिसांनवर राजकीय दबाब टाकण्याचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पोलिसांनी तक्रारदार नसल्याचे कारण देत गुन्हा दाखलच केला नाही. मात्र सोशल मीडियावर अपघाताची चर्चा रंगल्यावर पोलिस स्वतः तक्रारदार झाले आणि सुओमोटो गुन्हा दाखल केला. या धक्कादायक घटनेकडे कल्याण खडकपाडा पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे अचानक गुन्हा दाखल करण्याची वेळ आली आणि पोलिसांची एकच धांदल उडाली. पोलिसांना या घटनेबाबत विचारणा केली, असता कॅमेऱ्यासमोर बोलण्यास त्यांनी नकार दिला आहे.
पाहा व्हिडीओ :
महत्त्वाच्या इतर बातम्या :
पुणे पोर्शेप्रकरणात पोलिसांकडून 'या दोन चुका, गृहमंत्र्यांनी केलं मान्य; विधानसभेत फडणवीस-वडेट्टीवारांची जुंपली
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
