जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी, मुख्यमंत्री कार्यालयाला आला खळबळजनक ईमेल
Jalgaon News : जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची डंपरद्वारे हत्या करण्यात येईल, असा धमकीचा ईमेल मुख्यमंत्री कार्यालयाला प्राप्त झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Jalgaon News : जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (Jalgaon District Collector Ayush Prasad) यांची डंपरद्वारे हत्या करण्यात येईल. त्याच बरोबर जिल्ह्यात दंगली घडविण्यात येतील. जळगावचे वरिष्ठ पोलीस अधिकारी भ्रष्ट असल्याने त्यांना निलंबित करण्यात यावे, अशा स्वरूपाचा धमकीचा ईमेल मुख्यमंत्री कार्यालयाला (CMO Maharashtra) प्राप्त झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाला प्राप्त झालेला हा ई-मेल मुख्यमंत्री कार्यालयाकडून जळगावचे जिल्हाधिकारी आणि पोलिसांना पाठविण्यात आला असून पोलीस या ई-मेलच्या संदर्भात सखोल तपास करत आहेत. तर या घटनेसंदर्भात पोलीस अधीक्षकांना तपास करण्याबाबत सूचना देण्यात येतील आणि दोषींवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी दिली आहे.
मेल करणाऱ्याचा शोध घेणार, पोलीस अधीक्षकांची माहिती
तर जिल्हाधिकारी यांच्यासह विविध पोलिस अधिकाऱ्यांना जीवे मारण्याबाबत अगोदर ही तीन ते चार वेळेस धमकीचे मेल हे पोलिसांना मिळाले आहेत. या मेल मधील भाषा पाहता अशा ईमेलकडे फारसे गांभीर्याने घ्यावे, असे दिसत नाही. मात्र तरीही या सगळ्या घटनेबाबत सायबर सेलच्या माध्यमातून गुन्हा दाखल करत मेल करण्याचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे.
दोन पोलीस हवालदार लाच घेताना जाळ्यात
दरम्यान, अटक न करण्यासाठी व वरिष्ठांकडे अहवाल न पाठवण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जळगाव शहर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस हवालदारांना रंगेहाथ अटक केली आहे. तक्रारदार हे केंद्रीय अर्धसैनिक दलात कार्यरत असून, कौटुंबिक वादातून त्यांच्या पत्नीने 4 फेब्रुवारी 2025 रोजी त्यांच्या विरोधात जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी पोलिस हवालदार रवींद्र प्रभाकर सोनार (47) व धनराज निकुंभ यांनी तक्रारदाराकडे अटक न करण्यासाठी आणि वरिष्ठांना अहवाल न पाठवण्यासाठी एकूण 50 हजार रुपयांची लाच मागितली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयात शुक्रवार (दि.11) रोजी तक्रार प्राप्त झाल्यानंतर पडताळणी दरम्यान हवालदार धनराज निकुंभ यांनी तडजोडीअंती 20 हजार रुपये घेण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार शुक्रवार (दि.11) रोजी सापळा रचत कारवाईत हवालदार रवींद्र सोनार यांना 20 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली.
आणखी वाचा
मोठी बातमी : जामखेडच्या दोन मित्रांचा पिंपरीत एकाच झाडाला एकाचवेळी गळफास, कारण काय?























