फुकटचा वडापाव दिला नाही, हॉटेल चालकावर डोक्यात थेट सिमेंटचा ब्लॉक घातला; आरोपी फरार, पोलिसांत गुन्हा दाखल
Ambernath Crime: वडापाव फुकट दिला नाही म्हणून हॉटेल चालकावर जीवघेणा हल्ला, आरोपी आकाश विरोधात अंबरनाथ पोलिसांनी केला गुन्हा दाखलअंबरनाथ पश्चिम येथे फॉरेस्ट नाका परिसरातील माऊली कृपा हॉटेलमध्ये घडली घटना
Ambernath Crime News: वडापाव फुकट दिला नाही म्हणून हॉटेल चालकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. अंबरनाथमध्ये (Ambernath News) ही धक्कादायरक घटना घडली असून आरोपी आकाश विरोधात अंबरनाथ पोलिसांनी (Ambernath Police) गुन्हा दाखल केला आहे. परंतु, घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. अंबरनाथ पश्चिम येथे फॉरेस्ट नाका परिसरातील माऊली कृपा हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे.
फुकट वडापाव दिला नाही म्हणून एका माथेफिरूनं हॉटेलचालकावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. या हल्ल्यात हॉटेल चालक गंभीर जखमी झाला आहे. हॉटेल मालकाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.
अंबरनाथ पश्चिमेला फॉरेस्ट नाका परिसरात हनुमान मंदिराजवळ माऊली कृपा हॉटेल आहे. या हॉटेलचे चालक शरद आवारे यांच्या हॉटेलमध्ये आकाश हा नेहमीच उधारीवर वडापाव खात होता. तसेच, त्याची बऱ्याच दिवसांपासूनची उधारी शिल्लक होती. त्यामुळे हॉटेल चालकानं फुकट वडापाव देण्यास नकार दिला. तसेच, आता दुकान बंद करायची वेळी झाली आहे आणि वडापावही शिल्लक नाही, त्यामुळे तुला आता वडापाव देऊ शकत नसल्याचं आरोपी आकाशला हॉटेल चालकानं सांगितलं. त्यानंतर, हॉटेल चालकानं आरोपी आकाशला मागची उधारी शिल्लक आहे, ती तू कधी देणार? अशी विचारणा केली. हॉटेल चालकानं उधारीची विचारणा करताच आरोपी आकाश संतापला. आकाशला राग अनावर झाला आणि त्यानं हॉटेलच्याच बाहेर असलेला सिमेंटचा ब्लॉक उचलला आणि तो थेट हॉटेल चालकाच्या डोक्यात घातला.
आरोपी आकाशनं केलेल्या हल्ल्यात हॉटेल चालक गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ जवळच्याच खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. दरम्यान, याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी आकाश घटनेनंतर फरार झाला आहे. सध्या पोलीस आरोपीचा शोध घेत असून घटनेचा तपास सुरू असल्याची माहिती अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :