पत्नीला संपवलं, इमारतीवरुन उडी मारण्यापूर्वी मुलासाठी विमानाचं तिकीट बुक केलं, गोरेगाव हत्याप्रकरणात नवी माहिती
Crime News Mumbai: मुंबईतील गोरेगाव भागातील जवार नगर येथे पेडणेकर दाम्पत्याचे मृतदेह सापडले होते.
Crime News Mumbai मुंबई: मुंबईतील गोरेगाव भागातील जवार नगर येथे पेडणेकर दाम्पत्याचे मृतदेह सापडले (Mumbai Crime News) होते. एका इमारतीच्या फ्लॅटमध्ये 55 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला. तर इमारतीच्या आवारात 58 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यात (Mumbai Police) या घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू आहे. यादरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
किशोर पेडणेकर असे मृत पुरुषाचे नाव असून राजश्री पेडणेकर असे महिलेचे नाव आहे. किशोर पेडणेकर यांनी आत्महत्येपूर्वी आपल्या नातेवाईकाला मेसेज केला होता. यामध्ये त्यांची मालमत्ता कुठे आहे, याची माहिती देण्यात आली होती. तसेच मुलाला आपल्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर त्वरित मुंबई गाठता यावं, यासाठी त्यांनी लेकाच्या नावे दिल्ली-मुंबई विमानाचं तिकीटही बूक करुन ठेवलं होतं.
नेमकं काय घडलं?
गोरेगाव येथील एका गृहनिर्माण संस्थेत शुक्रवारी पन्नाशीतील जोडपे मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली. किशोर पेडणेकर या व्यक्तीने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आलं.किशोरने आधी पत्नी राजश्रीचा गळा आवळून तिचा खून केला आणि नंतर इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं आहे. राजश्री पेडणेकर या व्यवसायाने फिजिओथेरपिस्ट होत्या. तर पत्नी राजश्री पेडणेकर हिचा खून झाला आहे. पोलिसांनी सांगितले की, किशोरचा मृतदेह शुक्रवारी सोसायटीच्या कंपाऊंडमध्ये आढळून आला. त्यांनी कोणता विषारी पदार्थ प्राशन केला होता का नाही हे फॉरेन्सिक चाचण्यांमधून स्पष्ट होणार आहे. दरम्यान गेल्या दोन-अडीच वर्षापासून किशोर पेडणेकर हे तणावात होते. तसेच त्यांना उच्च मधुमेहही होता.