Buldhana News : 'गुड बाय...आम्ही जग सोडून जातोय,' मेसेज करत करडी धरणात विवाहितेने दोन मुलांसह उडी मारुन आयुष्य संपवलं
Buldhana News : बुलढाण्यात 30 वर्षीय विवाहितेने आपल्या दोन लहान मुलांसह करडी धरणात उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येनंतर तिचा मृतदेह धरणाच्या पाण्यावर तरंगून आला. तर दोन मुलांचा शोध प्रशासन घेत आहे.
Buldhana News : बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात एका 30 वर्षीय विवाहितेने आपल्या दोन लहान मुलांसह करडी धरणाच्या (Kardi Dam) पाण्यात उडी घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली. ही महिला धाडजवळच्या करडी इथली रहिवासी होती. या घटनेनंतर भागातील नागरिकांनी धरणाच्या घटनास्थळी मोठी गर्दी केली होती तर या आत्महत्येमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. काल ही (27 जुलै) घटना घडली.
सरिता ज्ञानेश्वर पैठणे असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. आत्महत्येनंतर या महिलेचा मृतदेह धरणाच्या पाण्यावर तरंगून आला. तर तिच्यासोबतच्या दोन मुलांचा शोध प्रशासन आणि नागरिक घेत आहेत. दरम्यान महिलेच्या आत्महत्येनंतर तिच्या माहेरकडच्यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. मृत महिलेचा भाऊ शरद कौतिकराव दामोदर (रा.फरदापूर जि.औरंगाबाद) यांनी धाड पोलिसात तक्रार असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यांच्या तक्रारीनुसार, बहीण सरिताचा विवाह 2011 मध्ये करडी इथल्या ज्ञानेश्वर पैठणे यांच्याशी झाला होता, दरम्यान ते दोघे नोकरीच्या निमित्ताने औरंगाबाद या ठिकाणी होते. परवा ते या आपल्या गावात आले होते. परवा (26 जुलै) रात्री सरिता पैठणे यांनी भावाच्या मोबाईल फोनवर 'गुडबाय आम्ही जग सोडून जातोय' तसेच 'कपाटातील रजिस्टर पोलीस काकांना द्या', अशा आशयाचा मेसेज केला होता. हा मेसेज पाहिल्यानंतर त्यांनी बहिणीला मोबाईल फोनवरुन संपर्क साधला. यावेळी सरिताचे पती ज्ञानेश्वर पैठणे यांच्याशी बोलणं झालं. सरिताकडे फोन द्या असं म्हटल्यावर ज्ञानेश्वर यांनी सरिता, मुलगी वेदिका (वय 11 वर्षे) आणि मुलगा वंश (वय 9 वर्षे) यांच्यासह पहाटे पाच वाजल्यापासून घरातून कोणालाही न सांगता निघून गेल्याचं सांगितलं.
यानंतर सरिता यांचा भाऊ शरद दामोदर यांनी तातडीने करडी गाव गाठून त्यांचा शोध घेतला. नातेवाईकांना विचारणा केली मात्र कुठेही शोध लागला नाही. शेवटी सरिताचा मृतदेह करडी धरणाच्या पाण्यावर आढळून आल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता सरिता ज्ञानेश्वर पैठणे यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला. तर दोन चिमुरड्यांचा शोध पोलीस घेत आहेत. शरद दामोदर यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी पती, सासू आणि सासरे यांच्याविरुद्ध भादवि कलम 306, 498-अ, 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अद्यापही करडी धरणाच्या पाण्यात त्या दोन्ही मुलांचा शोध सुरु आहे.