Crime : कपाटाचं लॉक दुरूस्त करायला आला अन् 11 लाखांच्या दागिन्यांवर हात साफ केले, गोंदियातील घटना
Gondia Crime News : रस्त्यावर फिरणाऱ्या एका व्यक्तीला घरातील कपाटाचं लॉक दुरूस्त करायला सांगितलं आणि त्याने दागिन्यांवर डल्ला मारल्याची घटना गोंदियात घडली.
गोंदिया : घरातील कपाटाचे लॉक दुरुस्ती करण्यासाठी आलेल्या एका इसमाने घरफोडी करून 220 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेल्याची धक्कादायक घटना गोंदियात घडली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला मध्यप्रदेशातून अटक केली. पोलिसांनी आरोपीकडून 11 लाख 68 हजार रुपयांचा मुद्देमाल आणि सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.
या प्रकरणातील चोर हा अतिशय शातीर असल्याने पोलिसांना हुलकावणी देत होता. गोंदिया पोलिसांनी विविध पथक तयार करून या चोरट्याला मध्यप्रदेश राज्यातून अटक केली आहे.
गोंदिया शहरातील सिव्हिल लाईन परिसरात राहणाऱ्या तक्रारदार ममता खटवाणी यांनी रस्त्यावर फिरणाऱ्या एका चावी दुरुस्ती करणाऱ्या अनोळखी इसमास त्यांच्या घरातील कपाटाचे लॉक दुरुस्त करायला सांगितले होते. त्यावेळी लॉक दुरुस्त करण्याच्या बहाण्याने आरोपीने कपाटामध्ये ठेवलेले 220 ग्रॅम सोन्याचे दागिणे लंपास केले.
तक्रारदाराच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर तिने या प्रकरणी गोंदिया शहर पोलिसात गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांनी गोंदिया जिल्ह्यामध्ये कपाटाचे लॉक दुरुस्ती करणाऱ्या तसेच चोरी, घरफोडी, मोटार सायकल चोरी, जबरी चोरीचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याकरता सूचना दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे, पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचे पथक तयार करण्यात आले होते. सदर पथकामार्फत जिल्ह्यात कपाटाचे लॉक दुरुस्ती करणारे, तसेच चोरी, घरफोडी, मोटार सायकल चोरी, जबरी चोरीचे गुन्हे करणारे अशा सर्व गुन्हेगारांचा शोध घेण्यात येत होता. तसेच विविध गुन्हेगारांची माहिती एकत्र करून त्याचे विश्लेषण करण्यात येत होते.
प्राप्त माहितीच्या आधारे तसेच गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून आरोपी हा उधना जि. सुरत, राज्य गुजरात येथील असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकास रवाना करण्यात आले. आरोपी नामे गुरुबिर धिरसिंग सिंग (वय 31 वर्ष) रा. बापुनगर, उधना यास मध्यप्रदेश राज्यातील बडवाणी जिल्ह्यात कातिया येथे राहत असल्याचे समजल्यानंतर तेथे जावून पोलीस पथकाने त्यास ताब्यात घेतले आहे.
दिवसेंदिवस वाढत चाललेल्या चोरीच्या घटनेला आळा घालण्याकरिता नागरिकांनी देखील घरातील कुठलेही काम करण्याअगोदर तो व्यक्ती स्थानिक आहे का? ओळखीचा आहे का? हे तपासणे गरजेचे आहे. काही पैसे वाचविण्याच्या नादात आपण खूप काही गमावून बसतो. याकरता नागरिकांमध्ये देखील जनजागृती होणे गरजेचे आहे असं पोलिसांनी आवाहन केलं आहे.
ही बातमी वाचा: