Mahesh Gaikwad : गोळीबाराला कारणीभूत जमिनीचा वाद, महेश गायकवाड यांची या वादात एन्ट्री कशी? गोळीबाराचं नेमकं कारण समोर
Ganpat Gaikwad : आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबार प्रकरणात शिवसेनेच्या महेश गायकवाड यांचा प्रवेश कसा झाला याची माहिती समोल आली आहे.
कल्याण: जमिनीच्या वादातून भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार केल्याची घटना घडली. पण हा जमिनीचा वाद या दोघांतील नव्हता तर गणपत गायकवाड आणि जाधव कुटुंबीयामध्ये होता. त्यानंतर जाधव कुटुंबाने महेश गायकडवाडांना या प्रकरणात मध्यस्ती करायची विनंती केली आणि नंतर हा सर्व प्रकार घडल्याचं समोर आलं.
भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर बंदुकीच्या गोळ्या झाडल्या आणि या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. आमदार गायकवाड यांनी शनिवारी उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस ठाण्यातच हा गोळीबार केला.
गणपत गायकवाड जमिनीला कुंपण घालण्यासाठी गेले
कल्याणमधील व्दारली गावातील जमीन जाधव कुटुंबीयांनी एका विकासकाकडे करार करून डेव्हलपमेंटसाठी दिली आहे. मात्र त्या विकासकासोबत आमदार गणपत गायकवाड हे भागिदार आहेत. आमदार गणपत गायकवाड हे जमिनीवर कंपाउंड करण्यासाठी गेले, त्यावेळी जाधव कुटुंबाशी त्यांचा वाद झाला.
महेश गायकवाड या प्रकरणात मध्यस्तीसाठी आले
जमिनीचे पैसे तुम्हाला दिले आहेत, तुम्ही कुठेही जा, माझे कोणीही काहीही करू शकत नाही असं त्यावेळी भाजपचे आमदार गायकवाड यांनी जाधव कुटुंबाला सांगितलं. त्यावेळी जाधव कुटुंबाने शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी या वादात तडजोड करावी अशी विनंती केली.
जाधव कुटुंबाच्या विनंतीवरून महेश गायकवाड यांची या प्रकरणात एन्ट्री झाली आणि पुढे ही गोळीबाराची घटना घडली.
पोलीस प्रोटेक्शन मिळावं अशी जाधव कुटुंबाची मागणी
महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर जाधव कुटुंब हे घाबरलेल्या अवस्थेत आहे. या घटनेमुळे जाधव कुटुंब हे दहशतीखाली वावरत आहे. त्यांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवणे बंद केले आहे. त्यानंतर जाधव यांनी आमदार गायकवाड यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून आपल्याला संरक्षण मिळावे अशी जाधव कुटुंबाची मागणी आहे.
काय आहे प्रकरण?
भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार केल्याचा प्रकार घडला आहे. या दोघांच्या दरम्यान एका 50 गुंठे जमिनीवरून वाद सुरु होता. शुक्रवारी हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहचले. यावेळी गणपत गायकवाड यांचा मुलगा देखील पोलीस ठाण्यात होता. मात्र पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप करत स्वतः गणपत गायकवाड पोलीस ठाण्यात पोहचले आणि त्यांनी थेट शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला.
मी स्वत: पोलिसांसमोरच गोळी झाडली याचा मला याचा पश्चाताप नाही. कारण माझ्या मुलांना जर ते पोलिसांच्या समोर मारत असतील, तर मग मी काय करणार. पोलिसांनी मला पकडलं, त्यामुळेच तो वाचला. मी त्यांना जीवे मारणार नव्हतो, पण पोलिसांच्या समोर जर असं कोणी करत असेल तर आत्मसंरक्षणासाठी हे करणं गरजेचं असल्याचं गणपत गायकवाड म्हणाले.
दरम्यान, भाजप आमदार गणपत गायकवाड यांना 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ही बातमी वाचा: