11.49 लाखांच्या बनावट नोटांसह चौघांना अटक; ठाणे शहर खंडणी विरोधी पथकाची कारवाई
ठाणे शहर खंडणी विरोधी पथकाने मुंब्र्यात सापळा रचून भारतीय चलनातील बनावट नोटांसह चार आरोपींना अटक केली आहे.
ठाणे : भारतीय चलनातील बनावट नोटा घेऊन मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत संशयीत आरोपी येणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर ठाणे शहर खंडणी विरोधी पथकाने मुंब्र्यात सापळा रचून चार आरोपींना अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून 200, 500 आणि 2000 रुपयांच्या 11 लाख 49 हजार रुपयांच्या नोटाही जप्त करण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त त्यांच्याकडून 7 विविध कंपन्यांचे मोबाईल फोन आणि स्कॅनर मशीनही हस्तगत करण्यात आल्या आहेत.
खंडणी विरोधी पथकाने अटक केलेल्या आरोपींकडे 200, 500 आणि 2000 रुपयांच्या बनावट चलनी नोटा सापडल्या आहेत. पोलिसांनी त्या जप्त केल्या आहेत. 11 लाख 49 हजारांच्या या नोटांमध्ये 200 रुपयांच्या 15 नोटा, 500 रुपयांच्या 948 नोटा, 2000 रुपयांच्या 336 नोटा अशा एकूण 11 लाख 49 हजार रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत. अटक आरोपींच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात भादंवि कलम 489(अ ), 489(क ) प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.
अटक आरोपींच्या चौकशीत या बनावट नोटा आरोपी प्रवीण देवाजी परमार आणि आरोपी मुजफ्फर पावसकर यांच्या स्कॅनर प्रिंटरच्या सहाय्याने जेके बॉण्ड पेपरचा वापर करून छपाई करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. त्या बनावट नोटा मुंब्रा, ठाणे, नवीमुंबई आणि मुंबई परिसरात वटविण्यासाठी आणल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे. खंडणी विरोधी पथकाने अटक आरोपींमध्ये मुजम्मील मोहोम्मद साल्हे सुर्वे(40), मुजफ्फर शौकत पावसकर (41), प्रवीण देवजी परमार(43) नसरीन इम्तियाज काझी(41) यांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या :