Crime News: कल्याण हादरलं! अल्पवयीन मुलीवर चौघांकडून सामूहिक अत्याचार, आरोपीत एक अल्पवयीन
Crime News: एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. यातील एक आरोपी अल्पवयीन आहे. या घटनेने कल्याण हादरलं आहे.
Crime News: महिला, मुलींच्या सुरक्षितेच्या मुद्यावर चिंता व्यक्त केली जात असताना दुसरीकडे कल्याणमध्ये (Crime In Kalyan) हादरवणारी घटना समोर आली आहे. कल्याण पूर्वेत राहणाऱ्या एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बहाण्याने बोलवून मित्राच्या घरी नेऊन सतत दोन दिवस अळीपाळीने चार नराधमाने सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात (Police Station) सामूहिक बलात्कारासह पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चारही नराधमांना बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.
साहिल राजभर (वय 18), सुजल रमेश गवती ( वय 20 ) विजय राजेश बेरा (वय 21) आणि एक अल्पवयीन मुलगा अशी अटक करण्यात आलेल्या नराधमांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन 15 वर्षीय मुलगी ही कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुटुंबासह राहते. तर आरोपीपैकी एक तिचा मित्र आहे. त्यातच 24 एप्रिल रोजी पीडित मुलीला आरोपी पैकी एकाने इंस्टाग्रामवर पीडित मुलीशी संपर्क केला. त्यावेळी आरोपीने माझ्या प्रेयसीला संशय आहे की, माझे प्रेम तुझ्यावर तर प्लिज तिला येऊन दोघांमध्ये तसे काही केवळ मैत्री आहे, हे सांगावे असा मेसेज केला. या बहाण्याने बोलावून पीडित मुलीला बोलावले होते. त्यानंतर तिला उल्हासनगरमधील एका मित्राच्या घरी जात तिच्यावर चार आरोपींनी आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला.
दरम्यान, पीडित मुलगी बाहेर गेली पण बराच वेळ झाला तरी घरी आली नाही म्हणून कुटुंबीय धास्तावले. त्यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली. तक्रारींचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी पीडित मुलीचा शोध सुरू केला. या दरम्यानच्या काळात आरोपींनी दुसऱ्या दिवशीही दुसऱ्या मित्राच्या खोलीवर नेऊन पुन्हा तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर 26 एप्रिल रोजी पीडित मुलगी कल्याण रेल्वे स्थानकात कोळसेवाडी पोलिसांना आढळून आली.
पोलिसांनी तिच्याकडे अधिक चौकशी केली असता सामूहिक बलात्काराचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर पीडित मुलीच्या तक्रारीवरून चार नराधम मित्रांवर भादंवि कलम 376 आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दखल करून त्यांचा शोध सुरू केला. बारा तासाच्या आतच चारही नराधमांना अटक करण्यात आली. आरोपींना आज कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता अधिक पोलीस कोठडी सुनावली आहे. तर एका अल्पवयीन आरोपीची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास कोळसेवाडी पोलीस करीत आहेत.