गोरेगाव पूर्व आयटी पार्कमागील जंगल परिसरात भीषण आग; दरवर्षी डोंगराला आग लागते तरी कशी? पर्यावरण प्रेमींचा सवाल
Fire Accident : गोरेगाव पूर्व आयटी पार्कमागील जंगल परिसरामध्ये शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
मुंबई : गोरेगाव पूर्व आयटी पार्कमागील (Goregaon East IT Park) जंगल परिसरामध्ये शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. ही आग इतकी भीषण होती की, लांबूनही ही आग स्पष्टपणे दिसत होती. तीन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आलं. या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. परंतु ही आग नेमकी कशी लागली? याबाबतचा तपास दिंडोशी पोलिस करत आहेत.
भीषण आगीत शेकडो झाडं जळून खाक झाल्याची शक्यता आहे. ज्या जंगल परिसरामध्ये आग लागली तो परिसर हा संजय गांधी नॅशनल पार्कचा एक भाग असल्याची माहिती आहे. या परिसरात बिबट्या, मोर, वानर, हरण असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे वन्यजीव आहेत. तसेच या परिसरातील आगीच्या घटनेमुळे येथील वन्यजीवांना देखील धोका निर्माण झाला आहे.
दरवर्षी डोंगराला आग लागते तरी कशी?
दिंडोशी डोंगराला लागून रहेजा, संकल्प, आयटी पार्क, म्हाडा अशी मोठी लोकवस्ती आहे. या डोंगराला आग लाऊन येथील डोंगर व हिरवळ, झाडे व झुडपे नष्ट केला जात असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी केला आहे.
भिवंडीत मध्यरात्रीच्या सुमारास तीन अपघात, दोन जण किरकोळ जखमी
भिवंडी शहरातील अरुंद उड्डाणपूल हे अपघाताला कारणीभूत ठरत असल्याचे चित्र आहे. या मागील कारण म्हणजे शहरातील स्वर्गीय राजीव गांधी उड्डाणपूल तसेच भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम उड्डाणपूल या दोन्ही उड्डाणपूल वर मध्यरात्रीच्या सुमारास दोन अपघात झाले असून यामध्ये दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. तर एका अपघातात दुचाकीचा अपघात झाला आहे.
स्वर्गीय राजीव गांधी उड्डाणपूलावर बाग ए फिर्दोसकडे उतरत असताना एका भरधाव कारने समोरून येणाऱ्या कारला समोरून जोरदार धडक दिली. यावेळेस अपघात करणारा कार चालक सुरुवातीपासूनच बेदरकारपणे कार चालवत असल्याने त्याच्या मागून येणाऱ्या एका कार चालकांने मोबाईल वर त्याचे चित्रीकरण सुरू केले होते. त्यामध्ये संपूर्ण अपघात कॅमेरा मध्ये कैद झाला आहे. तर दुसरा अपघात भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम उड्डाणपूलच्या सुरुवातीलाच नदिनाका या ठिकाणी घडला आहे. एक भरधाव ट्रक उड्डाण पुलावरून वाड्याच्या दिशेने उतरत असताना समोरील रस्ते दुभाजकाचा त्याला अंदाज न आल्याने ट्रक थेट दुभाजकावर चढला.
या अपघातात ट्रक जर उलटला असता तर मोठी दुर्घटना घडू शकली असती. तर तिसरी अपघाताची घटना चाविंद्रा या परिसरात घडली असून दुचाकी चालक रस्ता ओलांडत असताना समोरून येणाऱ्या ट्रक चा अंदाज न आल्याने दुचाकी ट्रक खाली घुसली. या अपघातात दुचाकी चालक किरकोळ जखमी झाला आहे.
हे ही वाचा