पत्नीच्या मित्राकडून उकळली लाखोंची खंडणी; तोतया पोलीस अधिकारी गजाआड, मानपाडा पोलिसांची कारवाई
पोलीस चौकशीत आपण सदर तरुणीचा पती असून तिच्याशी वाद सुरु आहेत. दरम्यान पत्नीशी असलेल्या या व्यासायिकाच्या मैत्रीची माहिती मिळाल्यानेच याच्याकडून पैसे उकळल्याचेही आरोपीनं कबुल केलं आहे.
कल्याण : पत्नीच्या मित्राला पोलीस अधिकारी असल्याचे भासवत त्याला ब्लॅकमेल करून त्याच्याकडून लाखो रुपयांची खंडणी उकळणाऱ्या भामट्याला मानपाडा पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. दरम्यान तुषार शिलवंत असे या आरोपीचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून आरोपी आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद सुरु होते. त्यातच लॉकडाऊनमुळे त्याचा व्यवसाय ठप्प झाला होता. आर्थिक चणचणीतून त्याने खंडणी उकळल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
भिवंडीतील रहिवासी असलेल्या तुषार याच्या पत्नीची डोंबिवली परिसरातील तक्रारदार व्यावसायिकाशी मैत्री होती. आरोपी तुषारचा व्यवसायदेखील लॉकडाऊनमुळे ठप्प झाला होता. आपल्या पत्नीच्या व्यावसायिक मित्राची माहिती मिळताच आरोपीने तिच्या मोबाईलमधून व्यावसायिक मित्राचा नंबर मिळवला. त्यानंतर त्याला 7 एप्रिल रोजी डोंबिवली पूर्वेकडील सागरली परिसरातील त्याच्या ऑफिसमध्ये गाठलं. पत्नीच्या व्यावसायिक मित्राला आपण क्राईम ब्रांचचा पोलीस अधिकारी असून आपल्याकडे तरुणीने तक्रार केल्याचे सांगितले. तसेच जर करावाईपासून बचाव करण्यासाठी व्यावसायिकाकडून पैसे घेतला. तरुणीच्या तक्रारीवर कारवाई न करण्यासाठी त्याच्याकडून चार दिवसांत 5 लाख रुपये उकळले. यानंतर 1 मे पासून पुन्हा सदर तरुणी कारवाईसाठी आमच्यावर दबाव आणत असल्याचं सांगत, तिचे तोंड गप्प करण्यासाठी आणखी 10 लाख रुपये मागितले. आरोपीकडून वारंवार पैशाची मागणी होत असल्यामुळे त्रासलेल्या व्यावसायिकाने याप्रकरणी अखेर मानपाडा पोलिसांत तक्रार दाखल केली.
दरम्यान, तक्रारीनंतर पुन्हा एकदा आरोपीचा पैशासाठी फोन येताच शंकरने याची माहिती मानपाडा पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ दुर्गाडी किल्ल्याजवळ सापळा रचला. काही वेळाने आरोपी पोलीस अशी पाटी अडकवलेल्या चार चाकी गाडीतून व्यावसायिकाकडून 3 लाख रुपये घेण्यासाठी घटनास्थळी येताच दबा धरुन बसलेल्या पोलिसांनी त्याला रंगेहाथ अटक केली. त्याने पोलीस चौकशीत आपण सदर तरुणीचा पती असून तिच्याशी वाद सुरु आहेत. दरम्यान पत्नीशी असलेल्या या व्यासायिकाच्या मैत्रीची माहिती मिळाल्यानेच याच्याकडून पैसे उकळल्याचेही आरोपीनं कबुल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :