Ratnagiri News : दापोली नगरपंचायतीत 5 कोटी 81 लाखांचा अपहार, तत्कालीन लेखापालावर गुन्हा दाखल, गैरव्यवहाराचा आकडा वाढणार?
Ratnagiri News : दापोली नगरपंचायतीचे तत्कालीन लेखापाल दीपक सावंत यांच्याविरोधात निधी अपहार प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 5 कोटी 81 लाख 10 हजार 309 रुपये अपहार प्रकरणात हा गुन्हा दाखल झाला आहे.
Ratnagiri News : रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातल्या दापोली नगरपंचायतीचे (Dapoli Nagar Panchayat) तत्कालीन लेखापाल दीपक सावंत यांच्याविरोधात निधी अपहार प्रकरणात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 5 कोटी 81 लाख 10 हजार 309 रुपये अपहार प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरपंचायतीचे सध्याचे लेखापाल सिद्धेश खामकर यांनी तक्रार दिली आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. दापोली नगरपंचायतीचे तत्कालीन लेखापाल सावंत यांनी 2021 ते 2022 या आर्थिक वर्षात अपहार केल्याचे कार्यालयीन चौकशी समितीच्या अहवालातून उघड झालं आहे. उपनगराध्यक्ष खालीद रखांगे, नगरसेवक रवींद्र क्षीरसागर यांनी हा अपहार उघड करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
लक्षणीय बाब म्हणजे सध्याची अपहाराची रक्कम ही एका आर्थिक वर्षाची असून ही रक्कम आणखी वाढीव असू शकते असा देखील अंदाज सध्या वर्तवला जात आहे. दीपक सावंत यांनी 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीत कोणतेही काम न करता संबंधित रक्कम ही विविध खात्यांमध्ये वळवलेली होती. नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी देवानंद ढवळे यांनी याबाबतचा खुलासा सावंत यांच्याकडे मागितला. पण त्यांच्याकडून त्याबाबतचा खुलासा केला गेला नाही. त्यानंतर 16 सप्टेंबर रोजी त्यांना निलंबित करण्यात आले. पण नगरपंचायतीत झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या अपहरामुळे आता एकच खळबळ उडाली आहे.
पदाचा गैरवापर करुन सरकारकडून आलेला निधी वळवला
दीपक सावंत हे 1 जानेवारी 2003 पासून दापोली नगरपंचायतीमध्ये लेखापाल पदावर कार्यरत होते. या कालावधीत त्यांनी दापोली नगरपंचायतीच्या विविध बँक खात्यांतील दोन कॅशबुक तयार केली होती. त्यांनी दिनांक 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 या आर्थिक वर्षात दापोली नगरपंचायतीच्या विविध खात्यांमध्ये सरकारकडून आलेल्या विविध निधीतून आणि दापोली नगर पंचायतीच्या स्वनिधी खात्यातून रक्कम वर्ग केली. पदाचा गैरवापर करुन स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी सरकारच्या निधीचा अपहार केल्याचे सिद्ध झालं.
दीपक सावंत यांनी 50 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
दीपक सावंत यांनी आपल्या कार्यकाळात 50 कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार गैरव्यवहार केल्याचा आरोप सत्ताधारी पक्षातर्फे पत्रकार परिषद करण्यात आला होता. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. तत्पूर्वी नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी देवानंद ढेकळे यांनी दापोली पोलीस स्थानकात याबाबत लेखी तक्रारही दिली होती. यानंतर दापोली पोलिसांच्या वतीने संबंधित कागदपत्रांची तपासणी करण्याचे काम सुरु होते. अखेर सोमवारी (10 ऑक्टोबर) रात्री दीपक सावंत यांच्यावर नगरपंचायतीमध्ये 5 कोटी 81 लाख 10 हजार 309 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.